आर्वी तालुक्यातील तलाठी रवी अंजारे  यांनी वडिलांच्या तेराव्याचा खर्च टाळून 51 हजार रुपये निवारा गृहात असलेल्या मजुरांच्या जेवणासाठी देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

तालुक्यातील धनोडी येथे कार्यरत तलाठी रवी अंजारे यांचे वडील श्रीराम अंजारे यांचे 1 एप्रिलल रोजी निधन झाले, याच दरम्यान संचारबंदी सुरू झाल्याने परतीच्या प्रवासाला निघालेले काही मजूर आर्वीत अडकले, त्यांची व्यवस्था आर्वी महसूल प्रशासनाने धर्मशाळेत केली मात्र त्यात भरच पडत गेल्याने प्रशासनाला पैशांसह अन्य वस्तूंची जुळवाजुळव करावी लागत असल्याची बाब  स्वतः शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अंजारे यांच्या लक्षात आली होती. ही अडचण ओळखून त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या विचारातून  मित्र व कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करीत धार्मिक विधींना फाटा देण्याचा निर्णय घेतला.  सर्वानुमते तेरावा व अन्य विधींवर होणारा अपेक्षित 51 हजार रुपयांचा खर्च निवारा गृहातील कामासाठी देण्याचे ठरले. त्यानुसार आज(शुक्रवार) तहसीलदार चव्हाण यांना या रकमेचा धनादेश अंजारे यांनी सुपूर्द केला, मजुरांच्या जेवण व्यवस्थेवर ही रक्कम खर्च करण्याची त्यांची इच्छा पूर्ण करण्याची हमी यावेळी त्यांना देण्यात आली.

आणखी वाचा- Coronavirus : जाऊ द्या न घरी… मजुरांचा,विद्यार्थ्यांचा आक्रोश अन् मारामारी

राज्यात करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाउनची घोषणा केलेली आहे. त्यामुळे अनेक स्थलांतरित मजुरांसह हातावर पोट असणाऱ्यांचे अन्न-पाण्याबरोबरच निवाऱ्याचे देखील हाल होत आहे. प्रशासनाकडून या सर्वांची सोय करण्याचा सर्वोतपरी प्रयत्न सुरू आहे. मात्र प्रशानसानाबरोबच समाजातील काही दानशूर व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्ती देखील अशा गरजूंच्या मदतीसाठी पुढे येत असल्याचे दिसत आहे.