१० वर्षांपूर्वी कुही तालुक्यात राहणारे अमृत भदाडे पोलीस खात्यात रुजू झाले.. त्यांची नेमणूक गडचिरोलीतच होती.. घराची आर्थिक जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावर होती….शनिवारी काकाच्या घरी वास्तूशांतीचा कार्यक्रम असल्याने अमृत गावी येणार होते.. पण नियतीने अमृत भदाडेंचा घात केला आणि अमृतऐवजी त्याचे पार्थिवच गावी आले.

गडचिरोलीतील कुरखेडा येथे नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात पोलीस दलातील १५ जवान शहीद झाले. यात कुही तालुक्यातील चिचघाट येथे राहणारे अमृत भदाडे यांचा समावेश होता. अमृत दहाडे यांचे प्राथमिक शिक्षण चिचघाट आणि पुढील शिक्षण कुहीत झाले. अमृत हे घरातील मोठे चिरंजीव होते. त्यांच्यानंतर बहीण आणि एक लहान भाऊ आहे. लहान भाऊ शेती बघतो तर बहिणीचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. अमृत यांचे आई- वडील वृद्ध आहेत. अमृत हे विवाहित होते. तीन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले असून त्यांना दीड वर्षांची लहान मुलगी देखील आहे. शेतीतील उत्पन्न घटल्याने घराची जबाबदारी अमृत यांच्यावरच होती. ते दरमहिन्याला घरी पैसे पाठवायचे.

अमृत यांचे काका गावात राहत असून त्यांनी नुकतेच घर बांधले होते. नवीन घराच्या वास्तूशांतीचा कार्यक्रम शनिवारी होता आणि अमृत या कार्यक्रमासाठी गावी येणार होते. पण नक्षलींच्या हल्ल्यात अमृत शहीद झाले आणि गावात अमृत यांचे पार्थिव पोहोचले. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

मुलगा सैन्यात जावा, देशासाठी लढावा, गावाचे, देशाचे नाव मोठे करावे आणि कुटुंबाचा सांभाळ करावा असे स्वप्न उराशी बाळगलेल्या वयोवृद्ध आईवडिलांना आणि पत्नीला अमृतचे पार्थिव बघावे लागले. अमृत यांचे पार्थिव गावी पोहोचताच अमृत यांच्या कुटुंबीयांच्या आणि ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा होत्या.