सातत्याने जनाधार घटत चालल्याने अस्वस्थ झालेल्या नक्षलवाद्यांनी आता पोलीस खबऱ्यांसोबतच चळवळीला विरोध करणाऱ्यांनासुद्धा ठार मारण्याचा निर्णय घेतला असून, गडचिरोलीत अलीकडे झालेल्या दोन हत्या याचाच भाग असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या हंगामात हत्यासत्रात वाढण्याची भीती वरिष्ठ पोलीस अधिकारी व्यक्त करत आहेत.
माओच्या विचारांचा पुरस्कार करणाऱ्या नक्षलवाद्यांनी आजवर शेकडो सामान्य आदिवासींना वर्गशत्रू ठरवून ठार केले आहे. यातील बहुसंख्य हत्या पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून केल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी गडचिरोली व गोंदिया जिल्ह्य़ाच्या सीमेवर असलेल्या बेतकाठीजवळ पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ७ नक्षलवादी ठार झाले होते. या वेळी पोलिसांनी घटनास्थळावरून चळवळीशी संबंधित बरीच कागदपत्रे जप्त केली. त्यातून या नव्या निर्णयाची माहिती समोर आली आहे. या सीमावर्ती भागात सक्रीय असलेल्या नक्षलवाद्यांनी काही दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्य़ातील दरेकसाच्या जंगलात एक बैठक घेतली. यात चळवळीच्या घटत्या जनाधारावर विचारमंथन करण्यात आले. पोलिसांच्या सक्रीयतेमुळे अनेक गावात आता दलम सदस्यांना विरोध होऊ लागला असून, सामान्य नागरिक सदस्यांच्या तोंडावर बोलू लागले आहेत.
आजवर चळवळीला मदत करणारे गावकरी आता विरोधाची भाषा बोलू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात स्थिती आणखी कठीण होईल, असे मत या बैठकीत जहाल नक्षलवाद्यांनी व्यक्त केले. चळवळीला विरोध करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय पर्याय नाही, यावर या बैठकीत एकमत झाल्याची माहिती नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’ला दिली.