औंध संस्थानचा गजराज मथुरेकडे रवाना

श्री क्षेत्र औंध (ता.खटाव) संस्थानचा लाडका गजराज ‘मोती’ला आपल्याच गावी ठेवायचे या इर्षेने सुरू केलेल्या लढाईला अपयश आल्याने अखेर बुधवारी औंध आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी पाणावल्या डोळय़ांनी त्याला निरोप दिला. शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी रस्त्यावर येत या स्थलांतरास विरोध केला तरी वनविभागाने आपली कार्यवाही पूर्ण करत मोतीला मथुरेला हलवले.

औंध संस्थानच्या दिमाखात या मोतीने गेली पाच दशके आपला डौल कायम ठेवला. औंधच्या दसरा, नवरात्र व पौष यात्रेची शोभा त्याच्या सहभागाने वाढवली जात असे. पण ‘पेटा’ या संघटनेने मोतीला येथून हलवण्याची मागणी वनविभागाकडे केली होती. एप्रिल महिन्यामध्ये वनविभाग, पशुसंवर्धन विभागामार्फत या हत्तीची वैद्यकीय, शारीरिक, मानसिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याबाबतचा अहवाल संबंधित विभागाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार हा गजराज औंध येथून मथुरा येथील केअर सेंटर येथे स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. वनखात्याने संस्थान व देवस्थानचे गजराज ताब्यात घेऊन मथुरेकडे रवाना करण्याची पश्चिम महाराष्ट्रातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी श्रीक्षेत्र पाल व श्रीक्षेत्र जोतिबा देवस्थानचे गजराज वनखात्याने मथुरेला पाठवले आहेत.

या पाश्र्वभूमीवर औंध ग्रामस्थांनी भव्य मोर्चा काढून सर्व व्यवहार बंद ठेवत निषेध नोंदवला होता. कोणत्याही परिस्थितीत मोतीला स्थलांतरित करू द्यायचे नाही, हा निश्चय औंधवासीयांनी केला होता. दरम्यान, मोतीला नेण्यासाठी यंत्रणा आलीअसल्याचे समजताच हजारो नागरिक, युवक, महिलांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध व्यक्त केला. वाहने येणारा मार्गही रोखून धरला. त्या वेळी तणाव निर्माण झाला होता. परंतु प्रशासनाने मोतीला नेण्याची तयारी पूर्ण केली. दरम्यान, औंध संस्थानच्या मोती गजराजाला वन खाते ताब्यात घेणार हे निश्चित झाल्याने त्याच्या पाठीवर भरजरी झूल टाकून मोतीची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. या वेळी सुहासिनींनी त्याचे औक्षण केले. मानाच्या राजवाडा पटांगणावर सलामीही देण्यात आली.

त्यानंतर गजराज मोतीला मथुरा केअर सेंटरच्या वाहनामध्ये नेण्याचे प्रयत्न सुरू झाले. परंतु, त्यास हा गजराज नकार देत राहिल्याने प्रशासन हतबल झाले होते. तर, मोतीच्या चाहत्यांच्या गर्दीमुळे तणावपूर्ण पण, शांततेचे वातावरण होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. तणावाचे वातावरण गांभीर्याने घेऊन गजराजाला सरकारी मळय़ात नेण्यात येऊन तेथे उघडय़ा ट्रकमध्ये त्यास बसवण्याच्या प्रयत्नाला सायंकाळी चारच्या सुमारास यश आले, आणि तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.  मोतीने औंधनगरीकडे पाठ केली, आणि भारावलेल्या वातावरणात हजारो चाहत्यांनी गहिवरलेल्या स्थितीत त्याला निरोप दिला.