|| हर्षद कशाळकर

रायगड जिल्हा नियोजन मंडळाच्या नाविन्यपुर्ण उपक्रमा आंतर्गत माथेरान येथे आकाशगंगा प्रकल्प सुरु करण्यात आला होता. माथेरान मध्ये येणाऱ्या पर्यटकांना रात्रीच्या वेळी अकाशातील ग्रहतारे निरिक्षणाची संधी यामुळे उपलब्ध झाली होती. खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांच्या प्रयत्नांनी सुरु झालेल्या या प्रकल्पाला अनास्थेच ग्रहण लागले आहे. त्यामुळे प्रकल्पाचे भवितव्य अंधारात आले आहे.

अनास्था वाढली लोककल्याणकारी प्रकल्प उदासिनतेच्या गत्रेत जाऊन पडतात. असेच काहीसे चित्र माथेरानच्या आकशगंगा प्रकल्पाबाबत पहायला मिळते आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या नाविन्यपुर्ण योजने आंतर्गत माथेरान येथे या प्रकल्पाची सुरवात करण्यात आली होती. तत्कालिन जिल्हाधिकारी होनाजी जावळे, नियोजन अधिकारी राजेश तितर तत्कालिन नगराध्यक्ष अजय सावंत यांनी यासाठी पुढाकार घेतला. २०१४ साली सुरु झालेले प्रकल्पाचे काम २०१६ मध्ये पुर्ण झाले. जवळपास ८० लाख रुपये खर्च करून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. यात एक थ्रिडी थिएटर, स्टेटीक एक्झिबिशनची निर्मिती करण्यात आली. तर आकाश निरीक्षणासाठी आठ अत्याधुनिक उच्च दर्जाच्या टेलिस्कॉप बसवण्यात आले. माथेरान मध्ये येणारया पर्यटकांसाठी तसेच खगोल अभ्यासकांसाठी हा प्रकल्प एक पथदर्शी ठरला होता. मोठा गाजावाजाकरून सुरु झालेल्या या प्रकल्पाला आज सरकारी अनास्थेचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे प्रकल्पाचे भवितव्य अंधारात आहे.

प्रकल्प चालवणासाठी नेमणुक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन सहा महीने थकले आहे. थ्री डी शोचे सबस्क्रीप्शन संपल्याने तो देखील बंद करण्यात आला आहे. प्रकल्प उभारणीतील काही रक्कम अद्याप नगरपालिकेनी प्रकल्प व्यवस्थापकांना अदा केलेली नाही. त्यामुळे प्रकल्प जवळपास बंद पडत आला. वारंवार पाठपुरावा करूनही माथेरानचे नगरपालिका प्रशासन काही प्रतिसाद देत नसल्याचा आरोप प्रकल्प व्यवस्थापक शैलेश संसारे यांनी केला आहे. तर दुसरीकडे प्रकल्प व्यवस्थापन कंपनीच नगरपालिकेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे. प्रकल्पाचे लोकार्पण होऊनही संबधित प्रकल्प नगरपालिकेकडे हस्तांतरीत केलेला नाही. इथे काम करणारया कोणत्याही कर्माचारयाची माहिती नगरपालिकेकडे उपलब्ध करून दिली जात नाही. मात्र कंपनीच्या कर्मचारयांचे पगारासाठी महिन्याला लाखभर रुपये नगरपालिकेकडे मागीतले जात आहेत. यावर नगरपालिका प्रशासनाने आक्षेप घेतला आहे. प्रकल्प व्यवस्थापन कंपनीने किमान एक तज्ञ खगोलशास्त्रज्ञाची नेमणुक या ठिकाणी करणे गरजेच आहे. पर्यटक आणि खगोल अभ्यासकांना चुकीची माहिती दिली जाऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे. हा प्रकल्प चांगल्या पध्दतीने सुरु रहावा अशी आमची इच्छा आहे असेही नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

‘प्रकल्प चालवण्यासाठी नगर पालिकेनी सलग दोन वेळा निविदा मागविल्या होत्या. संबधिक कंपनीने या निविदांना प्रतिसाद दिला नाही, प्रकल्पाच्या ठिकाणी एकही खगोलशास्त्रज्ञाची कंपनीने नेमणुक करणे गरजेचे होते. मात्र तेही केलेले नाही. याउलट दरमहिन्याला लाखो रुपयांची बील कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी नगरपालिकेला पाठवली जात आहेत. सध्या यांची सखोल चौकशी सुरु आहे. नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेनी मान्यता दिली तरच  थकीत रक्कम दिली जाईल.’   – सागर घोलप, मुख्याधिकारी, माथेरान नगर परिषद.

‘वारंवार पाठपुरावा करूनही नगरपालिकेने कर्मचाऱ्यांचे पगाराचे पसे दिले नाही, प्रकल्प उभारणीतील काही रक्कम अद्याप दिली गेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प चालवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. प्रकल्पासाठी पाणी आणि स्वच्छता गृहांचा प्रश्नही अद्याप सुटलेला नाही.’  – शैलेश संसारे, प्रकल्प व्यवस्थापक

‘शासनाने या प्रकल्पावर जवळपास ८० लाख रुपये खर्च केलाय. त्यामुळे तो आता बंद पडायला नको, हा प्रकल्प खासगी नाही, सरकारी आहे हे लक्षात घेण गरजेचे आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांना तसेच खगोल अभ्यासकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे पाहणे गरजेचे आहे.’  – सुनील शिंदे, स्थानिक