गणेशमूर्तिकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पेणमधून यावर्षी जवळपास २५ लाख गणेशमूर्ती देशभरात पाठवण्यात आल्या आहे. कच्च्या मालाच्या किमती आणि कामगारांची मजुरी वाढल्याने गणेशमूर्तीच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढल्या आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेणमधून यावर्षी अमेरिका, इंग्लड, ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशस येथे १० ते १२ हजार गणेशमूर्ती पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणमधील गणेशमूर्तीचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे पेणच्या गणपतींच्या मूर्तीना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातून मागणी वाढत आहे. पेण शहराला गणेशमूर्ती व्यवसायाच्या बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पूर्वी पेण शहरापुरता मर्यादित असणारा हा व्यवसाय आज तालुक्यातील विविध भागांत मोठय़ा प्रमाणात पसरण्यास सुरूवात झाली आहे.
एकेकाळी शाडूच्या गणेशमूर्तीसाठी प्रसिद्ध असणारे पेण शहर आज आपली ओळख हरवून बसले आहे. कमी श्रमात जास्त मूर्ती बनवण्याच्या स्पध्रेत गणेश मूर्तिकारांनी शाडूच्या मातीची साथ सोडली असल्याचे पाहायला मिळते आहे.
आज पेण परिसरातून तयार होणाऱ्या ८० टक्के गणेशमूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आहेत. मातीचे गणपती हे हाताळायला नाजूक आणि वजनाने जड असतात त्यामुळे वाहतूक करताना त्यांची मोडतोड होण्याची शक्यता असते. याशिवाय मातीचे गणपती बनवायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे मूर्तिकारांचा प्लास्टरच्या मूर्ती बनवण्याकडे जास्त कल असल्याचे पेण गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर सांगतात.
साडेचारशे कारखाने
हमरापूर, वडखळ, दादर, बोरी, शिर्की या परिसरांतही गणेशमूर्ती बनवणारे साडेचारशे लहान मोठे कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांमधून दरवर्षी जवळपास २२ ते २५ लाख गणेशमूर्ती बनवल्या जाऊ लागल्या आहेत. जोहे, हमरापूर ही गावे तर कच्च्या गणेशमूर्तीची बाजारपेठ म्हणून विकसित झाल्या आहेत.
अलीकडच्या काळात गणेश मूर्तिकारांना आणखी एक समस्या भेडसावते आहे. सुबक मूर्तीसाठी घडवणारे आणि मूर्तीचे रंगकाम झाल्यानंतर आखणी करणारे कुशल कामगार मिळेनासे झाले आहेत. गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढत असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.
या व्यवसायाला समूह विकास योजनेंतर्गत संघटित स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मूर्तिकारांना स्वत:ची कंपनी स्थापन करून १० टक्के निधी उभारण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र मूर्तिकारांकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे ती रखडली.

यंदा किमतीत ३० टक्के वाढ
पेण परिसरात गणेशमूर्ती बनवण्याचे काम वर्षभर सुरू असते. यातून ३० ते ३५ हजार लोकांना रोजगार मिळतो. या व्यवसायातून दरवर्षी साधारणपणे ४५ कोटींची वार्षकि उलाढाल होते. गणेशभक्तांचा कल आणि मागणी लक्षात घेऊन दरवर्षी नवीन प्रकारच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. यावर्षीही पेण शहरात २५०हून अधिक प्रकारच्या गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या. या गणेशमूर्ती महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांतही रवाना करण्यात आल्या. काथ्या, शाडूची माती, रंग आणि कामगारांची मजुरी वाढल्याने यावर्षी गणेशमूर्तीच्या किमतीत साधारणपणे ३० टक्के वाढ झाली असल्याचे मूर्तिकार दीपक समेळ यांनी सांगितले.