वाळवा तालुक्यातील गोटिखडीमध्ये रणझुंजार चौकात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक बनलेल्या मशिदीमध्ये सोमवारी प्रांताधिकारी राजेंद्र जाधव आणि आष्ट्याचे पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या उपस्थितीत गणेशाची प्रतिष्ठापना मोठय़ा उत्साहात करण्यात आली. या वेळी मुस्लीम बांधवही मोठय़ा संख्येने आरतीला उपस्थित होते.

हिंदू-मुस्लीम ऐक्याचा हा यंदाचा ३६ वा गणेशोत्सव असून या परंपरेचे साक्षीदार होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष गणेश फाळके, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लालासाहेब थोरात, अ‍ॅड. अर्जुन कोकाटे, विनायक पाटील, जहांगीर शेख, जालिंदर थोरात, लियाकत जमादार, दस्तगीर इनामदार, रफिक मुलाणी, सलीम लेंगरेकर, महमंद पठाण, मजीद जमादार, लतीफ लेंगरेकर, प्रमोद जाधव यांच्यासह प्रांताधिकारी जाधव, जयश्री पाटील आदी उपस्थित होते.

झुंजार चौकातील मोकळ्या जागेत या मंडळाच्या गणेशमूर्तीची स्थापना करण्यात येत होती. १९८० मध्ये जोरात पाऊस आल्याने गणेशाची स्थापना कोठे करायची असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला. या वेळी ज्येष्ठ हिंदू-मुस्लीम कार्यकर्त्यांनी मशिदीत गणेशाची आराधना करण्याचा निर्णय घेतला. यानुसार गेली ३६ वष्रे मशिदीमध्ये गणेशाची आराधना करण्यात येत आहे. १९८२ मध्ये मोहरम आणि गणेशोत्सव एकाच वेळी साजरे झाले. त्या वेळी गणेशाबरोबरच पीर पंजाचीही स्थापना या ठिकाणी करण्यात आली होती.