आजपासून राज्यासह देशभरात ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर सुरु होणार आहे. बाप्पासाठी लागणारं आसन, त्याची आभूषणे, त्याच्यासाठी नैवेद्य या साऱ्याची तयारी घराघरांमध्ये पूर्ण झाली आहे. त्याप्रमाणेच या कालावधीमध्ये करण्यात येणारे काही व्रतवैकल्याची तयारीही आता जोर धरु लागली आहे. या व्रतवैकल्यांमध्ये हरितालिका, ऋषिपंचमी आणि गौरीपूजन यांना विशेष महत्व असून त्यांना अर्पण करण्यात येणाऱ्या पत्रींनाही तेवढंच महत्व आहे.

गणपतीमध्ये विशेषतः हरतालिका, ऋषीपंचमी, गौरीपूजन यांना विशिष्ट पत्री वाहिल्या जातात. या पत्रींना धार्मिक महत्त्व तर आहेच पण त्याबरोबरच त्याला शास्त्रीय महत्वदेखील आहे. त्यामुळे गणपतींच्या दिवसामध्ये या पत्रींना खास महत्व असतं. भारतीय संस्कृतीत पूजेला आणि देवाला फुले, पाने वाहण्यास विशेष महत्त्व आहे. देवतेनुसार यामध्ये बदलही होतात.

गणपतीला दुर्वा, पिंपळ, बेल, शमी, धोत्रा, तुळस, आघाडा, रुई, अर्जुन, कण्हेर, जाई, मालती, माका या २१ पत्री वाहिल्या जातात. या पत्रीमुळे वातावरण शुद्ध होते असे मानले जाते. इतकेच नाही तर या पत्रींपैकी अनेक पत्रींचा आरोग्यासाठीही विशेष उपयोग होतो. विशेष म्हणजे या पत्री गणपतीच्या काळात सहज उपलब्धही होतात.

पिंपळ बुद्धिवर्धक, रक्तशुद्धीकारक तसेच त्वचा, पोट व दंतविकारावर गुणकारी आहे. टॉन्सिल्सच्या आजारात बेलाच्या पानांचा काढा उपयोगी असतो. याची फळे मेंदू व हृदयाच्या स्वास्थ्यासाठी शक्तिवर्धक आहेत. गणपतीच्या काळात पावसाळा असल्याने विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते, अशावेळी हे उपाय निश्चित उपयुक्त ठरु शकतात. शमीमुळे शरीरातील उष्णतेचा नाश होतो. साल उगाळून लावल्यास व्रण जातात. दुर्वा या थंड असतात. महिलांच्या मासिक पाळी समस्येसाठी दुर्वांचे पाणी अतिशय उपयुक्त असते. जखमेवर पानांचा लेप केल्यास रक्त वाहणे बंद होते. घोणा फुटल्यावर नाकात दुर्वांचा रस घालतात. नागिणीवर दूर्वा वाटून लावतात व रस पोटात देतात, दाह कमी होतो. धोत्रा दमा, आकडी, फुफ्फुसाच्या नळ्या सुजणे, स्नायूंचे झटके यावर गुणकारी असतो.

घरगुती उपचारात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीमध्ये अनेक गुणधर्म असून त्याचा विविध विकारांवर उपयोग होतो. तुळशीची पाने उष्ण तर बी शीतकारक आहे. तुळशीची माती कीटकदंशावर उपयुक्त आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी माका उगवतो. माक्यामध्ये पाचक, कृमिनाशक व कफनाशक असे गुण आहेत. याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. विंचू दंश,त्वचाविकार, मूळव्याध, कावीळ, सूज अशा अनेक विकारांवर ही वनस्पती गुणकारी आहे. आघाडा हा स्त्रियांच्या रोगावर विशेष उपयुक्त असतो. श्रावणात जिवतीला यासाठीच पाने वाहतात. पावसाळ्यात छातीत साठणाऱ्या कफावर याचे क्षार उपयोगी असतात. अर्जुन या वनस्पतीत नैसर्गिक कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. अस्थी जोडण्यासाठी, त्यास मजबुती येण्यासाठी सालीचे चूर्ण वापरतात.

केवड्याची पाने, फुले विशेषतः गौरीसाठी वापरली जातात. केवड्यामुळे बुद्धी वाढते, फुलांच्या रसामध्ये तयार केलेल्या तुपाच्या सेवनाने मूत्रमार्गाचे रोगनिवारण होते. मालती मुखरोगावर अत्यंत उपयोगी असते. जाईच्या पानांच्या काढ्याने जखम धुवून त्यावर वाटलेली पाने लावली असता जखम बरी होते, तोंड आलेले बरे होते.