पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशाला निरोप देताना कोल्हापुरात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विसर्जनादरम्यान लेझीम खेळताना ह्रदय विकाराच्या झटक्याने संजय आनंदा पाटील यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. करवीर तालुक्यातील गिरगाव या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. कोल्हापूमध्ये यंदा डॉल्बीमुक्त मिरवणुकीने लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे.  त्यामुळे ढोल ताशे, लेझिम, ही पारंपारिक वाद्ये कोल्हापूरच्या मिरवणुकीचे खास आकर्षण आहेत. एकीकडे डॉल्बीमुक्त मिरवणुकीच्या ध्यास पूर्ण होत असताना या घटनेमुळे गिरगाव परिसरातील नागरिकांवर मात्र शाककळा पसरली आहे.

यंदा कोल्हापुरात डॉल्बीमुक्त गणेश उत्सव पार पाडण्यासाठी सर्वच पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले होते. त्यामुळे प्रथमच डॉल्बीमुक्त गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असताना पाटील यांच्या कुटुंबियांवर विघ्न कोसळले आहे.