दहा दिवसांच्या मंगलमय वातावरणात गणेशोत्सव साजरा केल्यानंतर आज अनंतचतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी विसर्जनापूर्वी बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी दगडूशेठ गणपती मंदिरात पहाटेपासूनच मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सुरूवात झाली आहे. सर्वप्रथम मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडईतील टिळक पुतळा येथे सकाळी दहा वाजता पालखीतून आगमन झाले. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते गणपतीची आरती करून विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली आहे. मागील काही वर्षांपासून मानाच्या गणपतींची मिरवणूक दीड दिवसांहून अधिक काळ चालत असल्यामुळे त्याचा पोलिसांवर प्रचंड ताण पडतो. त्यामुळे पुण्यातील मानाच्या पाच मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणूक वेळेत काढून कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा संदेश दिला जाणार आहे. तसेच मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये केवळ 15 मिनिटांचे अंतर ठेवले जाणार आहे. त्यामुळे यावर्षी पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकर संपेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पहिल्या मानाच्या गणपतीनंतर तांबडा जोगेश्वरी, गुरूजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. तसेच यंदा गणेश विसर्जन मिरवणूक वेळेत पार पडावी यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घेतला असून यावेळी बेलबाग चौकापासून मुख्य ढोल-ताशा पथके मिरवणुकीत सहभागी होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ढोल-ताशा पथके लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या बाजूला सज्ज राहणार असून तेथून बेलबाग चौकातच ती पथके मिरवणुकीत सहभागी होतील. यामुळे मंडई ते बेलबाग चौक दरम्यान लागणारा जादा वेळ कमी होणार आहे. तसेच एका पथकात ४० ढोल, १५ ताशे, १० ध्वजधारी आणि ३० जादा वादक असा ताफा असणार आहे. वादकांची संख्या मर्यादित करण्यात आल्याने वेळेत फरक पडणार आहे.