सागरी उधाणामुळे होणारी जमिनीची धूप रोखण्यासाठी रायगड जिल्ह्य़ातील चार समुद्रकिनाऱ्यावर ९ कोटींचे धूपप्रतिबंधक बंधारे बांधले जाणार आहेत. यासाठी राज्य सरकारने १६-१७ या आíथक वर्षांत १ कोटी ८४ लाख रुपयांची आíथक तरतूद केली आहे.

समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या उधाणामुळे कोकण किनारपट्टीवरील अनेक किनाऱ्यांची धूप होत आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील गावांना धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्ह्य़ातील मांडवा, रेवदंडा, काशिद आणि दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारे उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी ९ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे १ कोटी ५० लाख रुपये, रेवदंडा येथे १ कोटी, काशिद येथे ४ कोटी आणि दिवेआगर येथे २ कोटी ५० लाख रुपये खर्चून धूपप्रतिबंधक बंधारे उभारले जाणार आहेत. चालू आíथक वर्षांत यासाठी एकूण १ कोटी ८४ लाख रुपयांची आíथक तरतूद करण्यात आली आहे. यात मांडवा येथील बंधाऱ्यासाठी ३२ लाख ६१ हजार, रेवदंडा येथील बंधाऱ्यासाठी २१ लाख ७४ हजार, काशिद बंधाऱ्यासाठी ८६ लाख ९६ हजार, दिवेआगर बंधाऱ्यासाठी ५४ लाख ३५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्तन विभागामार्फत हे काम केले जाणार आहे.

अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार सुभाष पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतची मागणी केली होती.

यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्तन विभागाला यासंदर्भात उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर पत्तन विभागाने चारही धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांना मंजुरी दिली आणि अर्थसंकल्पीय निधीची तरतूद केली. येत्या महिन्याभरात चारही ठिकाणची कामे सुरू होणे अपेक्षित आहे.