आरोंदा किरणपाणी खाडीपात्रात गोवा राज्यातील वाळू व्यावसायिक बेकायदेशीररीत्या वाळू उत्खनन करताना महसूल खात्याच्या पथकाने पकडले. त्या चौघा वाळू व्यावसायिकांना बेकायदा वाळू उत्खनन केल्याप्रकरणी एक लाख ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावून सोडून दिले. या चार होडय़ांवर सुमारे १६ कामगार वाळू उत्खननासाठी कार्यरत होते.
महाराष्ट्र व गोवा राज्याची हद्द दर्शविणाऱ्या तेरेखोल खाडीपात्रात गोवा राज्यातील वाळू व्यावसायिक बेकायदेशीररीत्या वाळू उत्खनन करतात. आज प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या पुढाकाराने महसूलच्या भरारी पथकाने सकाळी ७ वाजताच आरोंदा गाठले.
या पथकात तहसीलदार सतीश कदम, नायब तहसीलदार शशिकांत जाधव, मंडळ अधिकारी हेळेकर, तलाठी नागराज, तसेच महसूल भरारी पथक आणि पोलीस आरोंदा येथे पोहोचले. प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी आज कारवाई करून येण्याचे नियोजन केले होते.
आरोंदा खाडीत सकाळी ७ वा. दोन होडय़ा वाळू काढत होते. त्यानंतर काही अवधीत आणखी दोन मिळून चार होडय़ा वाळू उत्खनन करीत होते. या होडय़ांवर परप्रांतीय सुमारे १६ मजूरही होते. महसूल विभागाने पोलिसांच्या दक्षतेने सागरी कवच यंत्रणा वापरून होडय़ा जप्त केल्या.
या वेळी चारही होडय़ांचे मालक रोहिदास भाटलेकर, राजन परब, प्रकाश दाजी, सचिन वेंगुर्लेकर यांनी आपण वाळू उत्खनन दंड भरण्यास तयार असल्याचे महसूल यंत्रणेशी बोलताना सांगितले. या वेळी तीन ते चार ब्रास वाळू चार होडीत होती. त्यानुसार १ लाख ७५ हजार रुपयांचा दंड करून होडय़ा सोडून दिल्या. या होडय़ांच्या चौघाही मालकांनी दंड भरला, असे तहसीलदार सतीश कदम म्हणाले.
सागरी कवच यंत्रणा व पोलिसांच्या मदतीने अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या चारही होडय़ा जप्त केल्या. त्यांच्यावर कारवाई करून दंड भरल्याने होडय़ा सोडाव्या लागल्या असल्याचे सांगण्यात आले. आरोंदा, सातार्डा, कास, सातोसे भागांत गोवा राज्यातील वाळू व्यावसायिक मोठय़ा प्रमाणात वाळू उत्खनन करतात त्यामुळे शेती-बागायतीचे प्रचंड नुकसान होत असून, खाडीपात्रही रुंदावले आहे त्यामुळे नारळ बागायतीला धोका निर्माण झाला असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. आरोंदा, सातार्डा या ठिकाणी कोकण रेल्वे, किरणपाणी व सातार्डा पाटो पुलाला त्यामुळे धोका संभवतो, असे बोलले जाते.