करोनाच्या काळात टीका करणार नाही असे आम्ही म्हणालो, की लगेच कोणी सोम्या गोम्या उठतो आणि विरोधकांवर टीका करतो, असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. करोना स्थिती हाताळण्यात महाविकास आघाडीचे हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून ते केंद्राकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, की मध्यंतरी करोना कमी झाला होता. त्यावेळेस दुसरी लाट येईल असे म्हंटले जात होते. त्या वेळी काही उपाय योजना केल्या असत्या तर आज परिस्थिती वेगळी दिसली असती. तसेच या काळात टीका करू नका असे सांगितले जाते. मात्र कोणी सोम्या गोम्या उठतो आणि विरोधकांवर टीका करतो. सरकार मधील मंत्री आत्ममग्न आहेत. त्यांना सामान्य माणसाशी काही देणं घेणं नाही. टाळेबंदी करताना गोरगरीब, हातावर पोट असलेले आणि शेतकरी यांना आर्थिक मदत सरकारने द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आणखी कोण, असे विचारताच फडणवीस म्हणाले, की चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या आम्ही समोर आणणारच. केवळ विरोधाला विरोध करणार नाही.