ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपा व शिवसेनेसह महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असे दोन्ही गट आपण पहिल्या स्थानावर असल्याचा दावा करत आहेत. शिवसेना हा या निवडणुकांमध्ये ३,११३ जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून, महाविकास आघाडीही भाजपाच्या पुढे असल्याचे शिवसेनेनं म्हटलं आहे. मात्र, भाजपाची अवस्था गिरे तो भी टांग उपर असल्याची टिप्पणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी केली आहे. दुसरीकडे आपण पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा भाजपानं केला आहे. निकाला संदर्भातील आकडेवारी भाजपाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शिवसेनेनं दिलेल्या माहितीनुसार १२,७११ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं ३ हजार ११३ जागा जिंकल्या असून, सर्वाधिक जागा जिंकणारा पहिल्या क्रमाकाचा पक्ष ठरला आहे. भाजपानं २ हजार ६३२ जागा जिंकल्या असून, दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी २४०० जागांसह तिसऱ्या क्रमाकावर आहे. काँग्रेसनंही राज्यात १८२३ जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ३६ जागी विजय मिळविला आहे. तर २ हजार ३४४ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या काँग्रेसच्या जागापेक्षा अधिक आहे.

आणखी वाचा- “नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही”; शिवसेनेचा भाजपाला इशारा

तर भाजपाच्या सांगण्यानुसार, निकालाचं चित्र पुढील प्रमाणे आहे.

मतदान झालेल्या एकूण ग्रामपंचायती : 12,711

आतापर्यंत हाती आलेले निकाल : 7233

भाजपा : 3131 (44 टक्के)

एकूण सदस्यांच्या जागा : 1,25,709

बिनविरोध : 26,718

आतापर्यंत हाती आलेले निकाल : 44,887

भाजपा : 18629 (42 टक्के)

विदर्भातील ग्रामपंचायत निकाल

चंद्रपूर : एकूण 604/भाजपा : 344

गोंदिया : एकूण 181/भाजपा : 106

भंडारा जिल्हा : एकूण : 145/भाजपा: 91

वर्धा जिल्हा : एकूण : 50/भाजपा : 29

नागपूर जिल्हा : एकूण 127/ भाजपा : 73

वाशीम जिल्हा : एकूण 152/भाजपा : 83

अकोला जिल्हा : एकूण 214/भाजपा : 123

बुलढाणा जिल्हा : एकूण 498/भाजपा : 249

अमरावती जिल्हा : एकूण 537/भाजपा : 113

यवतमाळ जिल्हा : एकूण 925/भाजपा 419

(गडचिरोलीतील 170 जागांवर मतमोजणी 22 जानेवारी रोजी)

विदर्भ : एकूण : 3433/भाजपा : 1630

त्यामुळे शिवसेनेच्या सांगण्यानुसार भाजपानं २,६३२ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपानं ३,१३१ जागा जिंकत निवडणुकांवर वरचश्मा राखल्याचा दावा केला आहे. खरी परिस्थिती संध्याकाळपर्यंत स्पष्ट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भाजपा नेत्यांनी खोटे आकडे सांगू नये -बाळासाहेब थोरात

“राज्यात भाजपाचा दारूण पराभव झाला असून, भाजपा नेत्यांनी खोटे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करण्याऐवजी खुल्या दिलाने पराभव मान्य करावा. राज्यात पार पडलेल्या १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, राज्यातील चार हजारांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाने बहुमताने विजय मिळवला आहे, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात निवडणूक निकालावर बोलताना म्हटलं आहे.