22 November 2017

News Flash

सिंधुदुर्गमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचे आज मतदान

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या ३२९ ग्रामपंचायती पैकी ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने

वार्ताहर, सावंतवाडी | Updated: November 26, 2012 2:18 AM

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या ३२९ ग्रामपंचायती पैकी ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित २७६ ग्रामपंचायतीसाठी सोमवार २६ नोव्हेंबरला मतदान होत आहे. दुसऱ्या दिवशी २७ नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. जिल्ह्य़ात १८२७ जागांसाठी ४०६१ उमेदवार रिंगणात आहेत.
जिल्ह्य़ातील २७६ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेत चार हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका ठिकाणी २७ नोव्हेंबरला मतमोजणी ठेवण्यात आल्याने २६ व २७ नोव्हेंबरला आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्य़ातील ग्रामपंचायत निवडणुकीत ११०० पोलीस बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. जिल्ह्य़ातील ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे ९१८ जागी सदस्य बिनविरोध झाले. जिल्ह्य़ात ३२९ ग्रामपंचायतीच्या २७४५ जागांपैकी ९१८ जागा बिनविरोध झाल्याने आता १८२७ जागांसाठी मतदान होत आहे.
ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणे असे मानले जाते. त्यामुळे काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत शक्तिप्रदर्शन केले आहे. लोकसभा निवडणुका पहिल्या होणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळावे म्हणून काँग्रेस पक्षाने निवडणुकीत रंगत आणली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसे, आरपीआय व जनता दल पक्षही सामील आहे. पण काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वबळाचे शक्तिप्रदर्शन केले आहे. शिवसेना, भाजपा व मनसे सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीत रिंगणात नाही. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन सुरू आहे.
ग्रामपंचायत निवडणुका पक्ष पातळीवर नको म्हणणाऱ्या बहुतेक गावांनी गाव पॅनेल उभे करून निवडणुकीत रंगत आणली आहे. काही ग्रामपंचायती गाव पॅनेल म्हणून प्रथम विजय घेऊन नंतर पक्षाचा झेंडा फडकवेल, असा आवाज बाहेर आल्याने गावच्या विकासात राजकारण आणणाऱ्या पुढाऱ्यांबाबत एकच चर्चा आहे.

First Published on November 26, 2012 2:18 am

Web Title: gram panchayat election today at sindhudurg