दिगंबर शिंदे

द्राक्षासाठी प्रसिद्ध असलेल्या तासगाव तालुक्यातील वडगाव येथील एका द्राक्ष उत्पादकाने साडेसहा सेंटीमीटर लांबीचा द्राक्षमणी असलेल्या वाणाचे संशोधन केले आहे. भल्यामोठ्या आकाराच्या या फळाला ग्राहकांचीही पसंती मिळत असून अद्याप बारसेही न झालेल्या या द्राक्षाला बाजारात चार किलोला तब्बल चारशे एकावन्न रुपयांचा दर मिळाला आहे.

तासगाव तालुक्यातील वडगाव येथील द्राक्ष उत्पादक विजय शंकर देसाई यांनी त्यांच्याच बागेत केलेल्या प्रयोगातून हे नवे वाण जन्माला आले आहे. देसाई यांची एकूण १३ एकर शेत जमीन आहे. यातील ४ एकर शेतीवर आठ वर्षांपूर्वी त्यांनी ‘सुपर सोनाका’ जातीची द्राक्षबाग उभी केली. या बागेतील एका झाडावर त्यांना वेगळ्या पद्धतीचे द्राक्षघड  दिसले. त्यांनी त्या झाडाच्या काड्या काढून त्याची अन्यत्र दोन एकरवर स्वतंत्र लागवड केली. गेली आठ वर्षे विविध प्रयोग करून त्यांनी ही बाग वाढवली, जोपासली. गेल्या वर्षी पहिल्यांदा या द्राक्षवेलींना फळे लागली आणि हे द्राक्षमणी देखील तब्बल साडेसहा सेंटीमीटर लांबीच्या मण्यांचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अशी एवढ्या मोठ्या आकाराची द्राक्षे यापूर्वी कुठेही तयार झालेली नव्हती किंवा कुणी पाहिलीही नव्हती. यामुळे या द्राक्षांबद्दल सर्वांनाच आकर्षण वाटू लागले. गेल्या वर्षी मर्यादित स्वरूपात मिळालेल्या या द्राक्षाला लगोलग मोठी मागणी येत त्याची चढ्या दराने विक्री झाली.

अन्य जातीपेक्षा या जातीच्या द्राक्षामध्ये रोगप्रतिकारक क्षमता जास्त असल्याचेही आढळून आले आहे. तसेच या द्राक्ष वेलींची पानेही मोठी आहेत. यामुळे यातून पुरेसा अन्नसाठा तयार होत. त्याद्वारे घडाचे पोषणही चांगले होत मणी भरले जात आहेत. बाजारात खाण्यासाठी प्रामुख्याने लांबट मणी आणि पिवळा रंग असलेल्या द्राक्षाला पसंती असते. या पार्श्वभूमीवर या लांबट आकाराच्या द्राक्षाला देशांतर्गतच नाहीतर आता विदेशातूनही मागणी येऊ लागली आहे.

४ किलोला ४५१ रुपये दर

ही नव्याने संशोधित द्राक्षे यंदा मुंबईसह विदेशातही पाठविण्यात आली आहेत. बोटाएवढे द्राक्ष मणी, आकर्षक रंग, जिभेवर रेंगाळणारी चव यामुळे या द्राक्षाला चांगली मागणी येत आहे. मागील वर्षी चार किलोस ५०१ रुपये दराने या द्राक्षाची खरेदी झाली. तर यंदा द्राक्षाची एकूण आवक जास्त असतानाही बारसेही न झालेल्या या द्राक्षाच्या ४ किलोच्या पेटीस ४५१ रुपये दर मिळाला आहे.