शरद पवार यांची टीका; बँकांना निधी, मात्र शेतकऱ्याला केंद्राचा आधार नसल्याची खंत

शेती क्षेत्राकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्यानेच यंदा देशाचा विकासदर घसरला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना तोटा भरून काढण्यासाठी केंद्राकडून ८० हजार कोटींचा निधी दिला जातो. परंतु संकटातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरसकट कर्जमाफीसाठी हात वर केले जातात. केंद्राचे हे दुटप्पी धोरण असल्याची टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली. शेतकरी व दीनदुबळ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला खेचण्यासाठी दोन्ही काँग्रेसना मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे लागेल, अशीही हाक त्यांनी दिली.

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील जन्मशताब्दी वर्षांनिमित्त अकलूज येथे रविवारी आयोजिलेल्या समारंभात पवार हे बोलत होते. या निमित्ताने पवार यांच्यासमवेत काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे तिघेही एकत्र आल्याचे पाहावयास मिळाले. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील आदींचीही उपस्थिती होती.

अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाने बांधलेल्या रत्नाई महिला वसतिगृहाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते म्हणाले, केंद्र व राज्यात सत्तेवर बसलेल्या मंडळींना अन्नधान्य पिकविणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांचीच जास्त चिंता आहे. परंतु खाणारे कायम बघायचे असतील तर पिकविणारा जगला पाहिजे, हे आताच्या सत्ताधाऱ्यांना कोणी सांगायचे? राष्ट्रीयीकृत बँकांना तोटा भरून काढण्यासाठी मागील पंधरा दिवसांत केंद्राने आपल्या तिजोरीतून ८० हजार कोटींचा निधी काढून दिला. बँकांना तोटा भरून काढण्यासाठी केंद्राकडे पैसा आहे, तर दुसरीकडे कर्जाच्या असह्य़ बोजाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी सरळ हात वर केले जातात.  केंद्राच्या सांख्यिकी खात्याचा अहवाल नुकताच बाहेर आला आहे. यात देशाचा विकासदर घटल्याचे नमूद केले आहे. कोणत्याही क्षेत्रावर संकट कोसळले तर त्यास मदत करण्याचे कर्तव्य राज्यकर्त्यांना बजावावे लागते. मात्र त्याचे भानच आजच्या राज्यकर्त्यांना नाही, असे खडे बोल सुनावले.

सुशीलकुमार शिंदे यांनी, आपण आमदार होण्याअगोदर सोलापूर जिल्ह्य़ात शंकरराव मोहिते-पाटील यांचे मोठे प्रस्थ होते. ते जिल्ह्य़ाच्या आठवणीतून कधीही जाणार नाहीत. मी व विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार अगदी सुरळीतपणे केल्याचे शिंदे यांनी आवर्जून सांगितले. मोहिते-पाटील यांनी, पवार यांच्याशी असलेले आपले ॠणानुबंध कायम राहतील. सोलापूर जिल्हा त्यांच्या पाठीशी कायम राहील, अशी ग्वाही दिली. जयसिंह मोहिते-पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

‘दंगल घडविणारे सरकारने शोधावेत’

भीमा-कोरेगाव येथील दंगल बाहेरच्या लोकांनी येऊन केल्याचे सांगतात. हे दंगल करणारे बाहेरचे लोक कोण, हे सरकारने शोधून काढावे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करीत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. अकलूज येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संभाजी भिडे यांच्यावर त्यांचे नाव न घेता हल्ला चढविला.