राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारे २०१८-१९ या वर्षातील कला क्षेत्रातील दोन जीवन गौरव पुरस्कार बुधवारी जाहीर करण्यात आले. यांपैकी तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर झाला. तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांची निवड करण्यात आली आहे. सांस्कृतीक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी ही घोषणा केली. पाच लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे.

विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या गुलाबबाई संगमनेरकर या सध्या ८८ वर्षाच्या असून त्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून तमाशात काम करायला सुरुवात केली. तुकाराम खेडकर, कांताबाई सातारकर, आनंदराव जळगावकर यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. ‘रज्जो’ नावाच्या हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली आहे. लता मंगेशकर यांच्या ‘लताबाईंच्या आजोळची गाणी’ या संगीत अल्बममध्येही त्यांनी अदाकारी केली आहे.

तर, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांनी वयाची सत्तरी ओलांडली असून संगीत रंगभूमीवर त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. बालगंधर्व हे त्यांचे आदर्श होते. ‘मानापमान’, ‘एकच प्याला’, ‘झाला महार पंढरीनाथ’, ‘कृष्णार्जुनयुद्ध’, ‘संशयकल्लोळ’, ‘स्वयंवर’ आणि ‘सौभद्र’ यांसारख्या प्रसिद्ध संगीत नाटकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.