रत्नागिरीच्या गुरुप्रसाद संस्थेचे मोलाचे कार्य; परंतु निधीची चणचण

रत्नागिरी जिल्ह्य़ातील एचआयव्हीग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम करणाऱ्या गुरुप्रसाद संस्थेने या रुग्णांच्या एचआयव्हीबाधित बालकांसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्याचा संकल्प सोडला असून त्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची गरज आहे.

पेशाने डॉक्टर असलेल्या कै. देवदत्त गोरे यांनी २००३ मध्ये या कार्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यांच्या तालमीत तयार झालेल्या सेवाभावी कार्यकर्त्यांचा संच सध्या हे काम पुढे नेत आहे. गेले सुमारे एक तप कार्यरत असलेल्या या संस्थेकडे रत्नागिरी जिल्ह्य़ातील दोन हजार ३६५ एचआयव्हीबाधित व्यक्तींची नोंदणी झाली असून त्यामध्ये सुमारे पन्नास टक्के म्हणजे १,२२१ महिला आहेत आणि त्यांच्यापैकी बहुसंख्य विधवा आहेत. जिल्ह्य़ातील असे रुग्ण शोधून त्यांचे समुपदेशन करणे, त्यांना आवश्यक औषधोपचार नियमितपणे उपलब्ध करून देणे, तसेच त्यांचे कौटुंबिक व सामाजिक पुनर्वसन करणे, विशेषत: महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे इत्यादी कामे ‘गुरुप्रसाद’चे कार्यकर्ते चिकाटीने करत आहेत.

शरीरात दूषित रक्त मिसळल्यामुळे या आजाराचा संसर्ग होत असला तरी तसे होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात, पण त्यापैकी असुरक्षित शारीरिक संबंध या कारणावर विशेष भर दिला गेल्यामुळे या विकाराने बाधित रुग्णांकडे समाज काहीशा वेगळ्या, संशयाच्या, तिरस्काराच्या नजरेने पाहतो. त्यामुळे अनेकदा कुटुंबाकडूनही नाकारले जाण्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढवतो. त्याचबरोबर अघोषित सामाजिक बहिष्काराला तोंड द्यावे लागते. त्यातही पतीमुळे या आजाराची लागण झालेल्या आणि त्याच्या निधनानंतर वैधव्याचे एकाकी जीवन जगणाऱ्या स्त्रियांची अवस्था आणखीच कठीण बनते. अशा परिस्थितीत त्यांना आपुलकीचा हात देऊन जीवनात पुन्हा सन्मानाने जगण्यासाठी उभे करण्याचे अवघड आव्हान ‘गुरुप्रसाद’चे कार्यकर्ते पेलत आहेत.

एचआयव्हीबाधित माता-पित्यांकडून हा आजार संक्रमित झालेल्या १ ते १५ वयोगटांतील १६५ बालकांचीही काळजी ‘गुरुप्रसाद’तर्फे घेतली जात आहे. त्यामध्ये मुला-मुलींचे जवळजवळ समान प्रमाण (८३ मुलगे व ८२ मुली) आहे. सध्या यापैकी काही मुलांचे पंढरपूर किंवा गोव्यात काम करत असलेल्या संस्थांच्या मदतीने पुनर्वसन केले जाते.

एचआयव्हीग्रस्तांच्या जीवनाची नवी पहाट

पण भविष्यात त्यांच्यासाठी संस्थेचे स्वतंत्र वसतिगृह बांधण्याची योजना आहे. रत्नागिरीपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या करबुडे या ठिकाणी जमीन संस्थेला देणगीदाखल मिळाली आहे. तेथे हे वसतिगृह बांधण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी एकूण सुमारे एक कोटी रुपये निधीची गरज आहे. याचबरोबर सध्या संस्थेचे कर्मचारी, स्वयंसेवकांसाठी निधी उपलब्ध झाला असला तरी तो करारावर आणि विशिष्ट कालावधीपुरता आहे. संस्थेला आर्थिक स्थर्यासाठी कायमस्वरूपी निधीचीही गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्ती किंवा संस्थांनी त्यासाठी मदतीचा हात पुढे केल्यास हे आव्हान पेलणे शक्य होईल, असा संस्थेच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे.