हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग: टाळेबंदीमुळे माथेरानमधील हातरिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे, तर घोडेवाल्यांसमोरील आर्थिक संकट गडद झाले आहे.  पर्यटन बंद झाल्याने येथील अर्थकारण ठप्प झाले आहे. त्यामुळे रोजच्या कमाईवर चरितार्थ चालवणाऱ्या घोडेवाले, हातरिक्षाचालक आणि मजुरांची आर्थिक कोंडी झाली आहे.

माथेरानमध्ये घोडे आणि हातरिक्षा हे दळणवळणाची प्रमुख साधने आहेत. शहरात ४४० प्रवासी घोडे तर १८० मालवाहू घोडे आहेत. या घोडय़ांच्या माध्यमातून येथील प्रवासी  तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जाते. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे माथेरानचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबासह घोडय़ांचा सांभाळ करायचा तरी कसा, असा प्रश्न आहे. दुष्काळी काळात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या जातात. त्याच धर्तीवर या घोडय़ासांठी आता चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे.    शहरातील हातरिक्षाचालकांची परिस्थिती फारशी वेगळी नाही. ब्रिटिश काळापासून माथेरानमध्ये हातरिक्षा चालवल्या जातात. शहरात आजही ९४ हातरिक्षा आहेत. या रिक्षांमधून प्रवासी वाहतूक केली जात असते. एका रिक्षावर दोन ते तीन जण काम करतात. माथेरानमध्ये असे अडीचशे रिक्षाचालक सध्या कार्यरत आहेत. मात्र टाळेबंदीमुळे या सर्वावर उपासमारीची वेळ आली आहे. माथेरानचे संपूर्ण अर्थकारण पर्यटनाशी निगडित आहे. दरवर्षी उन्हाळ्यात येथे लाखोंच्या संख्यांनी पर्यटक येत असतात. यातून घोडेवाले आणि हातरिक्षाचालकांना आर्थिक फायदा होत असतो. पावसाळ्यात पर्यटकांचा ओघ मंदावतो.  या वर्षी मार्च आणि एप्रिल महिने टाळेबंदीत गेले आहेत. माथेरानमधील घोडय़ांसाठी सामाजिक संस्था आणि प्राणीमित्र संघटनाच्या मदतीने शासनाने खाद्यपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे अश्वपालकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे

माथेरानची १०० टक्के अर्थव्यवस्था ही पर्यटनाशी निगडित आहे. त्यामुळे शासनाने विशेष बाब म्हणून माथेरानसाठी आर्थिक पॅकेज देणे गरजेचे आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून पुढील तीन ते चार महिने स्थानिकांना आवश्यकतेनुसार छोटी आणि कमी व्याजदरातील कर्जे द्यावीत. पर्यटकांचा ओघ वाढला की या कर्जाची परतफेढ करणेही सहज शक्य होईल.

 -मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष

हातरिक्षाचालकांची परिस्थिती बिकट झाली आहे.  शासनाने या रिक्षाचालकांना धान्यपुरवठा तर करावाच, पण आर्थिक मदतदेखील करावी.

  – सुनील शिंदे,  सचिव, श्रमिक हातरिक्षाचालक संघटना

घोडय़ांवरही उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळी भागात जशा चारा छावण्या चालवल्या जातात तशी व्यवस्था करावी.

– राकेश कोकळे, अश्वपालक