27 February 2021

News Flash

हंसराज अहिर यांच्यासाठी दिल्लीचा मार्ग सोपा?

२०१४ मध्ये विरोधात निवडणूक लढलेले कॉंग्रेसचे माजी मंत्री संजय देवतळे आता भाजपवासी झाले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

रवींद्र जुनारकर, चंद्रपूर

कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ गेल्या १५ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. काँग्रेसमधील गटबाजी तसेच बसपा किंवा अन्य छोटय़ा पक्षांकडून होणारे मतविभाजन भाजपच्या पथ्यावरच पडले आहे. या वेळीही चित्र फार काही बदलेल अशी चिन्हे नाहीत.

चंद्रपूर जिल्हय़ातील चार व यवतमाळ जिल्हय़ातील दोन अशा सहा विधानसभा मतदार संघांचा या मतदार संघात समावेश होतो. कुणबी समाजाचे प्राबल्य असलेल्या या मतदार संघात जवळपास १८ लाख मतदार आहेत. येथे एकूण सहापैकी पाच आमदार भाजपचे तर एक शिवसेनेचा आहे.  या मतदार संघावर भाजपने २००९ पासून पकड घट्ट केली आहे. कॉंग्रेस आघाडी सरकारचा कोळसा घोटाळा उघडकीस आणून लोकप्रिय झालेले विद्यमान खासदार व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर १९९६ मध्ये प्रथम लोकसभेत निवडून गेले. कॉंग्रेस नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या बंडखोरीमुळे अहिर यांना तेव्हा तत्कालीन केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचा पराभव करता आला होता. त्यानंतर १९९८ च्या निवडणुकीत मात्र कॉंग्रेसचे वामनराव गड्डमवार व नरेश पुगलिया गटाचे मनोमीलन झाल्याने ९८ व ९९ अशा सलग दोन्ही निवडणुका नरेश पुगलिया यांनी सहज जिंकल्या. मात्र २००४ मध्ये पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षात बंड झाले व राजेंद्र वैद्य बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर रिंगणात उतरले. या मतविभाजनाचा फायदा भाजपला मिळाला व हंसराज अहिर पुन्हा लोकसभेत गेले. त्यानंतर अहिर यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. २००४, २००९ व २०१४ अशा सलग तीन निवडणुका अगदी सहज जिंकल्या. विशेष म्हणजे, या तिन्ही निवडणुकांमध्ये कधी राजेंद्र वैद्य तर कधी शेतकरी संघटना व आम आदमी पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अ‍ॅड.  वामनराव चटप यांनी लाखावर तर बहुजन समाज पक्षाचे अ‍ॅड. दत्ता हजारे यांनी हजारो मते घेतली. २०१४ मध्ये विरोधात निवडणूक लढलेले कॉंग्रेसचे माजी मंत्री संजय देवतळे आता भाजपवासी झाले आहेत. त्रिकोणी व बहुरंगी लढतीत झालेल्या मतविभाजनाचा फायदा नेहमीच अहिर यांना मिळत गेला आणि त्यांचा विजय अधिक सोपा होत गेला. आता परिस्थिती बदलली आहे.

अहिर यांनी १५ वर्षांत शेतकरी, रोजगार, उद्योगधंदे, प्रदूषण, शिक्षण यापैकी एकाही प्रश्नावर गांभीर्याने काम केले नाही. त्याचा परिणाम त्यांच्याविषयी शहर व ग्रामीण अशी दोन्ही भागात काही प्रमाणात नाराजी आहे. याच नाराजीचा सामना त्यांना वणी, आर्णी व चंद्रपुरातील बंगाली कॅम्पमध्ये करावा लागला होता. आता तर मतदार उघडपणे माणूस चांगला असला तरी विकास कामे झाली नाहीत ही नाराजी बोलून दाखवितात. प्लास्टिक इंजिनीअरिंग सुरू केले मात्र भद्रावती येथे कोळशापासून युरिया प्रकल्पाची घोषणा हवेतच विरली. औद्योगिक नगरी असतानाही आरोग्याच्या सुविधेच्या दृष्टीने विशेष प्रकल्पावर काम झाले नाही. सर्वाधिक रेल्वे थांबे देण्यात मात्र ते यशस्वी ठरले. सिकलसेल व थॅलेसेमियावर कामाला सुरुवात झाली. परंतु हॉस्पिटल झाले नाही. संघटनात्मक बळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ता हे अहिर यांच्यासाठी बलस्थान आहे.  असे असले तरी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याबरोबर वाढलेली कटुता हा मुद्दा अहिर यांना सतावू शकतो.

काँग्रेसने या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. पण कॉंग्रेस पक्षाकडे अहिर यांना लढत देईल असा सर्वसमावेशक उमेदवार नाही. विधी मंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार, माजी खासदार नरेश पुगलिया व माजी आमदार सुभाष धोटे ही नावे कॉंग्रेसकडून वारंवार घेतली जातात. वडेट्टीवार यांनी पक्षश्रेष्ठींनी निर्देश दिले तर निवडणुकीच्या रिंगणात उतरू अशी सावध भूमिका घेतली आहे तर धोटे यांनी यापूर्वीच माघार घेतली आहे. कुणबीच उमेदवार हवा असाही कॉंग्रेसश्रेष्ठींचा आग्रह आहे. त्यामुळेच कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे सुभाष धोटे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. कॉंग्रेसश्रेष्ठी पुगलिया व वडेट्टीवार अशा दोन्ही गटाला चालेल अशा सर्वसमावेशक उमेदवाराच्या शोधात आहे. शिवसेना व भाजप युतीच्या नुसत्याच वावडय़ा सुरू आहेत. त्यामुळे युती झाली नाही तर ऐनवेळी वरोराचे आमदार बाळू धानोरकर हेसुद्धा शिवसेनेकडून लोकसभेच्या आखाडय़ात उतरू शकतात. अहिर व धानोरकर यांचे सख्य सर्वश्रुत आहे. वंचित बहुजन आघाडी, बसपा कोणता उमेदवार देते यावरही बरीच राजकीय समीकरणे आहेत.

राष्ट्रीय रस्ते विकास कार्यक्रमातून ६ हजार कोटींची कामे सुरू आहेत. रेल्वेत देशात सर्वाधिक काम या लोकसभा क्षेत्रात झाले असून चंद्रपूर, वणी, बल्लारपूर, माजरी रेल्वे स्थानकावर ४० पेक्षा अधिक रेल्वे गाडय़ांचे थांबे तर मुंबईसाठी दोन, पुणे अशा चार नवीन रेल्वे गाडय़ा सुरू केल्या. फ्रंट लाईनचे काम जोरात सुरू असून चांदा फोर्ट-गोंदिया रेल्वे विद्युतीकरण पूर्ण, अंडरपास, घुग्घुस, वणी, बाबुपेठ रेल्वेपूलांना मंजूरी व निधी, चंद्रपूर, बल्लारपूर, माजरी, भद्रावती, वरोरा रेल्वे स्थानकांचा विकास करून देशातील क्रमांक एकचा दर्जा मिळविला. सिंचन, लघु सिंचन प्रकल्पासाठी, गोसेखुर्दसाठी निधी खेचून आणला, प्लास्टिक इंजिनीअरिंग(सिपेट)च्या माध्यमातून स्कील एज्युकेशन सुरू केले. अडीच हजार युवकांना नोकरी दिली. वेकोलित साडेसहा हजार शेतकऱ्यांच्या मुलाला नोकरी व लाखोंचा मोबदला दिला. वीज केंद्राचे दोन संच बंद करून प्रदूषण कमी केले. बंद उद्योग सुरू केले. शासकीय वैद्यक महाविद्यालय मंजूर केले. जनरेटिक व अमृतमधून स्वस्त औषधी देत आहोत. प्रधानमंत्री आवास, प्रधानमंत्री कृषी, मुद्रा योजनेतून मोठी कामे झाली.

    – हंसराज अहिर (खासदार तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री)

केंद्रीय गृहराज्यमंत्री खासदार हंसराज अहिर यांची २० वर्षांची कारकीर्द अतिशय निष्क्रिय राहिली आहे. त्यांनी एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. बारसे-तेरवी-लग्नसमारंभापुरते ते नेते राहिले आहेत. रेल्वेचा एकही नवीन प्रकल्प आणला नाही. उलट नोटबंदीनंतर लघुउद्योग बंद झाल्याने जिल्हय़ातील १ लाख २६ हजार लोकांचा रोजगार गेला. कॉंग्रेसने कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण केले. ते खासगीकरण करीत आहेत. किती शेतकऱ्यांना कोळसा खाणीत त्यांनी नोकरी दिली याचे उत्तर द्यावे. अहीर यांचा कार्यकाळ निराशाजनक व अपयशी राहिला आहे. भाजपात लाथाळय़ांचा आम्हालाच फायदा होईल.

      -विजय वडेट्टीवार (आमदार तथा   विधिमंडळ उपनेते, कॉंग्रेस)

  

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 12:42 am

Web Title: hansraj ahir chandrapur vidhan sabha constituency reviews
Next Stories
1 भाजपा-आरएसएसला दंगली घडवायच्या होत्या का? – प्रकाश आंबेडकर
2 दुष्काळात होरपळणाऱ्या बुलढाण्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
3 रायगडात काँग्रेस कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीचे वावडे!
Just Now!
X