मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे नागरीकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या फेरीवाल्यांच्या विषयात विशिष्ट धोरण आखावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात राज यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र दिलं असून यामध्ये फेरीवाला धोरणाची योग्य ती अंमलबजावणी न झाल्यास मनसे पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला आहे. मुंबई महापालिकेने सध्या दहा हजार फेरीवाल्यांच्या जागा निश्चित केल्या आहेत. याठिकाणी बसणाऱ्या फेरीवाल्यांकडे व्यवसायाच्या परवान्यासह अधिवास प्रमाणपत्र असणेही बंधनकारक आहे. अधिवास प्रमाणपत्र सादर करण्यास अनेक फेरीवाला संघटनांनी विरोध दर्शवला आहे. यामध्ये काँग्रेसच्या फेरीवाला संघटनेचाही समावेश आहे.

सध्या अनेक फेरीवाले नियमांचे पालन करत नसून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे मनसेचे म्हणणे आहे. नियमाप्रमाणे ज्यांच्याकडे कागदपत्रे आहेत त्यांना योग्य ती जागा द्यावी अशी मागणी मनसेने केली आहे. तसे न झाल्यास मनसे आपल्या पद्धतीने कारवाई करेल असा धमकीवजा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. ठाकरे यांनी आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेऊन हा इशारा दिला आहे. एल्फिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेनंतर मनसेने अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं. यावेळी राज्यभरातील अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर बऱ्याच ठिकाणच्या जागा रिकाम्या झाल्या होत्या आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी योग्य ती जागा मिळाली होती. मात्र आता पुन्हा एकदा परिस्थिती जैसे थे झाल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.