राजकीय कार्यक्रमांमध्ये व्यासपीठावर नेत्यांकडून म्यानातून तलवार बाहेर काढण्याचे प्रकार अनेकदा पहायला मिळतात. मात्र, औरंगाबाद खंडपीठाच्या पवित्र्यामुळे या तलवारी लवकरच कायमस्वरूपी म्यान होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी नगरमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्थानिक कार्यकर्त्यांनी तलवार भेट दिली होती. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मोदींनी ती तलावर म्यानातून बाहेर काढून सर्वांदेखत उंचवली होती. या सर्व प्रकाराविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. औरंगाबाद खंडपीठाने या याचिकेची गंभीर दखल घेत आता केंद्र सरकारला याविषयी शपथपत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भविष्यात अशाप्रकारच्या राजकीय तलवारबाजीवर बंदी येण्याची शक्यता आहे.