वातावरणातील बदलामुळे जिल्ह्य़ात स्वाइन फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांत या आजारामुळे तिघांचा मृत्यू झाला तर निफाड तालुक्यातील दोन रुग्ण स्वाइन फ्लूसदृश आजाराने ग्रस्त आहेत. दरम्यान, सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर स्थिती नियंत्रणात राहावी यासाठी जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लू कक्षातील खाटांची संख्या, मनुष्यबळ वाढविले जात आहे. वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लू पसरविणारे एच१ एन१ विषाणू सक्रिय झाले आहेत. ग्रामीण भागात आजाराचे लोण पसरले असून आतापर्यंत दिंडोरी तालुक्यातील दोन तर नगर जिल्ह्य़ातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. सद्य:स्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालयात तसेच विविध प्राथमिक रुग्णालयात फ्लूसदृश आजाराने ग्रस्त रुग्णांची तपासणी सुरू आहे. त्यात थंडी-ताप, सर्दी-खोकला, अंगदुखी, डोकेदुखी,मळमळ, उलटी, अतिसार आदी लक्षणे पाहून रुग्णांची प्राथमिक स्तरावर चाचणी करत पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयाकडे पाठविले जाते. आतापर्यंत जिल्ह्य़ात हजाराहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तीन दिवसांत २०हून अधिक रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे आढळली. त्यापैकी जिल्हा रुग्णालयात निफाड तालुक्यातील दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकाच्या अहवालात स्वाइन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले असून एकाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. या घडामोडींमुळे कुंभमेळ्यावर या आजाराचे सावट आहे. शाही पर्वणीसाठी लाखो भाविक दाखल होणार असल्याने आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयात आधीच सुरू केलेल्या स्वाइन फ्लू कक्षाची क्षमता वाढविण्याचे निश्चित केले आहे. मुबलक स्वरूपात औषधसाठा उपलब्ध असून श्वसनाचा त्रास होत असल्यास कृत्रिम श्वासोच्छ्वासासाठी अतिदक्षता विभागही कार्यान्वित करण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक असून रुग्णांची अंतर्गत व बाह्य़ रुग्ण विभागात तपासणी सुरू असल्याचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. होले यांनी सांगितले.