मुंबई : आरोग्य विभागाचे २० खाटांचे ते नेत्र रुग्णालय गेली १७ वर्षे दृष्टिहीन आहे. रुग्णालयाच्या इमारतीला बाहेरून उत्तम रंगरंगोटी असली तरी थेट शस्त्रक्रियागृहात मात्र चक्क कुत्रे व डुकरे फिरत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करण्याचे स्वप्न बाळगून काम करत आहेत, तर दुसरीकडे आरोग्य विभागाच्या या नेत्र रुग्णालयात ना शस्त्रक्रियागृहाचा पत्ता ना डॉक्टरचा पत्ता आहे. आठवडय़ातून केवळ बुधवारी तेथे कोणीतरी पांढरे डगलेवाले येतात असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ही कहाणी आहे नांदेडच्या किनवट तालुक्यातील मांडवी गावची..

तत्कालीन खासदार उत्तमरावजी राठोड यांनी ग्रामीण भागात डोळ्याच्या उपचारासाठी रुग्णालय असावे यासाठी अथक प्रयत्न करून केंद्र शासनाकडून निधी मिळवला. त्यातून १९८८ साली मांडवी गावी वीस खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले. सरहद्द गांधी खान अब्दुल गफारखान यांच्या नावाने उभे राहिलेल्या या रुग्णालयात एकेकाळी मोठय़ा प्रमाणात नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येत होत्या. २००१ साली येथील नेत्रशल्यचिकित्सकांची बदली झाली. पुढे येथील शस्त्रक्रियागृह नादुरुस्त झाले. तेव्हापासून हे रुग्णालय बंद अवस्थेत आहे. आज येथील शस्त्रक्रियागृहात कुत्रे व डुकरे फिरतात, तर येथील खाटा गंजून गेल्या आहेत. सुरुवातीला येथे वीसहून अधिक कर्मचारी होते. पुढे त्यातील बहुतेकांची अन्यत्र बदली करण्यात आली. सध्या येथे अवघे पाच कर्मचारी असल्याचे नांदेड येथील जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यातही हे रुग्णालय केवळ बुधवारी काही वेळासाठी उघडण्यात येत असून किनवट येथील सरकारी दवाखान्याचीही परिस्थिती अशीच आहे. खान अब्दुल गफारखान रुग्णालयाच्या आवारात गाईगुरे चरण्यासाठी येत असून येथे उपचारासाठी अपवादानेच कोणी फिरकत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. डोळ्याची तपासणी करण्यासाठी येथे आता कोणतीही यंत्रसामग्री नसून शस्त्रक्रिया होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाच्या शल्यविशारदांना याबाबत विचारले असता गेली अनेक वर्षे हे रुग्णालय बंद असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यानी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की तीन वर्षांपूर्वी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या निदर्शनास ही बाब आणण्यात आली होती व रुग्णालय पुन्हा सुरू करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली होती. मात्र त्यांनी याबाबत काहीच केले नाही. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी जिवाचे रान करत आहेत. आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच खासगी डॉक्टरांच्या सहभागातून लाखो शस्त्रक्रिया केल्या जात असताना आरोग्य विभागाचे ग्रामीण भागासाठी महत्त्वाचे असलेले हे नेत्र रुग्णालय ‘दृष्टिहीन’ बनले आहे. याबाबत आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांना विचारले असता, आपण याप्रकरणी तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर हे रुग्णालय पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.