शहरातही पावसाचा जोर वाढणार; धरणांत दिवसात सव्वा टीएमसी पाणी

पुणे : पुणे शहर आणि परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून पाऊस हजेरी लावत असला, तरी तो हलक्या स्वरूपाचा आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रामध्ये मात्र मुसळधार पाऊस होत असल्याने पाणीसाठय़ात वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळी सहापर्यंत धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने एकाच दिवसात पाणीसाठय़ात सव्वा टीएमसीने (अब्ज घनफूट) वाढ झाली. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने येत्या काही दिवसांत शहरातही पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.

शहरात नैर्ऋत्य मोसमी वारे दाखल झाल्यापासून केवळ एक ते दोन दिवस मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर आजपर्यंत केवळ पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चांगला पाऊस होत आहे. त्याचप्रमाणे मुंबईला धुवाधार पावसाने झोडपून काढले असताना पुण्यात मात्र पावसाला जोर नाही. अनेकदा ढग दाटून येत असले, तरी केवळ काही सरी बरसून आकाश निरभ्र होते. शहरात ही स्थिती असताना पाणीपुरवठा होणाऱ्या धरणामध्ये मात्र चांगला पाऊस पडत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शहरात १ जूनपासून केवळ २१२ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. काही दिवसांपासून रोज १ ते ४ मि.मी. पावसाची नोंद होत आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि पिंपरी- चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात जूनपासून ९०० ते १२०० मि.मी. पावसाची नोंद झाली.

गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळी सहापर्यंत धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला. एकाच दिवसात टेमघर क्षेत्रात १०३, तर पवनाच्या क्षेत्रात १४९ मि.मी. पावसाची नोंद झाली. वरसगाव आणि पानशेतच्या क्षेत्रात ५० मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीतील धरणांच्या साठय़ात एकाच दिवसात सव्वा टीएमसी पाणी जमा झाले. पुणे शहरासाठी एका महिन्याला सव्वा टीएमसी पाण्याची आवश्यकता असते. सध्या खडकवासला धरणसाखळीमध्ये १३.२२ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.

१ जूनपासूनचा पाऊस आणि पाणीसाठा

पुणे शहर                         २१२ मि.मी.

टेमघर                           १३६५  मि.मी.   (१.२६ टीएमसी)

वरसगाव                       ९४९ मि.मी.     (४.०९ टीएमसी)

पानशेत                        ९६० मि.मी.     (६.४६ टीएमसी)

खडकवासला                २७९ मि.मी.     (१.४१ टीएमसी)

पवना                          १२५७ मि.मी.    (४.२४ टीएमसी)

 

तापमान घटल्याने थंडावा

पावसाचे प्रमाण कमी असले, तरी दिवसभर कोसळणाऱ्या सरी आणि ढगाळ वातावरणामुळे शहरातील कमाल तापमानात घट झाली आहे. त्यामुळे दिवसाही काहीसा थंडावा अनुभवण्यास मिळत आहे. शुक्रवारी शहरातील कमाल तापमान २६.४, तर किमान तापमान २२.३ अंश सेल्सिअस होते.