राज्यभरात सर्वदूर हजेरी; रायगडात पूरस्थिती; नाशिक, पुण्यात संततधार; धरणक्षेत्रांतही समाधानकारक

गेल्या काही दिवसांपासून संततधार कोसळत असलेल्या पावसाने रायगड जिल्ह्य़ातील अंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागोठणे आणि रोहा या शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रावर रुसलेल्या पावसाने या परिसरात कृपावृष्टी केली असून नाशिक जिल्ह्य़ातही संततधार पावसाची नोंद झाली आहे.

रायगड जिल्ह्य़ात पावसाचा जोर सलग आठव्या दिवशी कायम आहे. जिल्ह्य़ातील रोहा, सुधागड आणि पाली परिसराला पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे. तर अंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्य़ात दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. पोलादपूर आणि नागोठणे येथील सुकेळी खिंडीपाठोपाठ आता माथेरान घाटात दरड कोसळली आहे. खोपोली येथे संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या. अंबा नदीने पहाटे धोक्याची पातळी ओलांडून नागोठणे शहरात प्रवेश केला. एसटी बसस्थानकात तीन फूट पाणी साचल्याने बस थांबा तात्पुरत्या स्वरूपात महामार्गावर हलविण्यात आला होता. भरलेल्या पुरामुळे वरवठणे माग्रे रोहेकडे, जिल्हा परिषदेचा नागोठणे – पेण रस्ता आणि शिवाजी चौकातून महाड बाजूकडे जाणारा रस्ता असे तीनही मार्ग काही तास वाहतुकीस बंद झाले होते. कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने अष्टमी पुल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे रोहा अष्टमी दरम्यानचा संपर्क तुटला होता. भिरा धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले.

रत्नागिरी-सिंधुदुर्गात जोर ओसरला

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात अनुक्रमे ७० व ५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातील संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा हे तीन तालुके वगळता अन्यत्र पावसाचा जोर बराच कमी झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या बहुतेक भागांमध्येही रविवारी दिवसभर अधूनमधून सरी पडत राहिल्या.

नाशिक जिल्ह्य़ात संततधार

शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर कायम राहिल्याने शहर परिसरासह जिल्ह्य़ात यंदा प्रथमच पावसाळा सुरू झाल्याची अनुभूती नागरिकांना आली आहे. इगतपुरी, हरसूल या भागात पावसाचा जोर अधिक असल्याने नदी-नाले यंदा प्रथमच खळाळून वाहू लागले.

नाशिक शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असणाऱ्या गंगापूर धरण क्षेत्रात म्हणजेच त्र्यंबकेश्वर परिसरातही दिवसभर पावसाने ठाण मांडल्याने आठवडय़ातून दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहण्याचे संकट उभे ठाकलेल्या नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

तूट नऊ टक्क्य़ांवर

संपूर्ण देश पर्जन्यछायेखाली आला असून १ जून ते २ जुलै या कालावधीत देशभरात १६४.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वसाधारणपणे या कालावधीत पडणाऱ्या मोसमी पावसाचे प्रमाण १८० मिमी असते. मात्र, जूनमध्ये उशिरा सुरू होऊनही या दरम्यानच्या काळातील तूट पावसाने भरून काढली असून आता ती नऊ टक्क्य़ांवर आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात जोर वाढण्याची शक्यता

पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रात शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली. मोसमी पावसाचे राज्यात आगमन झाल्यानंतर प्रथमच पश्चिम महाराष्ट्रात पावसाची नोंद झाली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर परिसरात सर्वदूर पाऊस सुरू असून आणखी जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भुशी धरणावर पर्यटकांची झुंबड

  • लोणावळ्यातील धुवांधार पावसाने पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेले भुशी धरण रविवारी पहाटे ‘ओव्हर फ्लो’ झाले.
  • धरणाच्या सांडव्यावरुन मोठया प्रमाणात पाणी वाहू लागले असून रविवारी या ठिकाणी पर्यटकांची एकच झुंबड उडाली.
  • यामुळे धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी तर झालीच, शिवाय पर्यटकांनी उभ्या केलेल्या वाहनांच्या लांबच- लांब रांगांमुळे पोलिसांना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा रस्ता बंद करावा लागला.

कोकण रेल्वे विस्कळीत

कोकण रेल्वे मार्गावर मुंबईहून रत्नागिरीकडे येत असलेल्या मांडवी एक्सप्रेस गाडीवर रविवारी सकाळी वीर ते करंजाडी स्थानकांच्या दरम्यान वडाचे मोठे झाड उन्मळून पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या वेळी गाडीचा वेग नियंत्रणात असल्यामुळे फारशी हानी झाली नाही.