• विदर्भ-मराठवाडय़ातही जोरदार; मुंबई ठप्प
  • अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर
  • ठाणे, रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पोषक स्थिती असल्याने राज्यात सर्वदूर पावसाचा कहर सुरू आहे.  राज्याच्या बहुतांश भागामध्ये शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस शनिवारी (३ ऑगस्ट) दिवसभर कायम होता. मुंबईसह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार सरी कोसळल्या, तर मराठवाडय़ातही पावसाची हजेरी होती.

कोकण, मध्य महाराष्ट्रात नद्यांनी धोक्याची पातळी ओलंडली. घाटमाथ्यावर धुवाधार पाऊस असल्याने बहुतांश धरणे भरली असून, काही धरणांतून विसर्गही सुरू करण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. रत्नागिरी शहरात समुद्राच्या मोठय़ा भरतीमुळे किनारपट्टीवरील घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती.

प्रामुख्याने कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोसळतो आहे. कोयना धरणातून शनिवारी सकाळपासून विसर्ग सुरू करण्यात आला. नाशिक जिल्ह्य़ातील १० धरणांतून विसर्ग करण्यात येत असून, पावसाचे प्रमाण पाहता तो वाढविण्यात येत आहे. त्यामुळे जायकवाडी प्रकल्पात पाणीसाठा जमा होऊ शकणार आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवाला आणि पिंपरीला पाणीपुरवठा होणाऱ्या पवना धरणातूनही विसर्ग करण्यात येत असून, हे पाणी उजनी प्रकल्पात जात आहे. नगरच्या भंडारदरा धरणातूनही विसर्ग करण्यात येत आहे.

 रायगड जिल्ह्य़ाला झोडपले

शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने रायगड जिल्’ाला अक्षरश: झोडपून काढले. अंबा, कुंडलिका, सावित्री नद्यांनी धोकापातळी ओलांडली आहे. नागोठणे, रोहा आणि महाड शहरांना पुराचा तडाखा बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दोन ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार झाले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. माणगाव येथील कळमजे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. रोहा परिसरातील ७० कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले.  पोलादपूर येथे २४ तासांत तब्बल २९५ मिलिमीटर पाऊस झाला.

 रत्नागिरीत मुसळधार

समुद्राला आलेल्या मोठय़ा भरतीमुळे रत्नागिरी शहरातील किनारपट्टीवरील वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. पावसामुळे मंडणगडात भारजा नदीला पूल आल्याने दापोलीशी संपर्क तुटला. पूल, रस्ता आणि किनाऱ्यावरील भातशेती पाण्याखाली गेली. दापोली, खेडमध्येही पावसाने धुमाकूळ घातला. संगमेश्वरच्या बाजारपेठेत सकाळपासून पाणी भरले होते. जिल्ह्य़ाच्या अंतर्गत भागातील रस्त्यांवर दरडी कोसळण्याचे प्रकारही झाले. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. खेडजवळ जगबुडी आणि चिपळूणजवळ वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली होती.

 नाशिकमध्ये पूर..

नाशिक शहरासह जिल्ह्य़ातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी जिल्ह्य़ातील १० धरणांतून विसर्ग आणखी वाढविण्यात आला. गोदावरीने धोक्याची पातळी गाठली असून दारणा नदीला पूर आला आहे. काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदा पात्रातील रामसेतू पाण्याखाली बुडाला. आसपासच्या भागात पाणी शिरले. पातळी वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सायखेडा पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे जिल्ह्य़ात रिपरिप सुरू आहे. धुळे जिल्ह्य़ात पावसामुळे जलसाठय़ातही वाढ झाली. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्य़ात मात्र अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

लातूरमध्ये दिलासा

संपूर्ण लातूर जिल्हाभर  शुक्रवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या भिज पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्य़ात पाऊस नसल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. भिज पावसाने तो सुटण्यास काहीअंशी मदत होणार आहे. खरिपाची पेरणी केलेल्या शेतक ऱ्यांच्या पिकांना हा पाऊस म्हणजे जीवदान आहे.

मराठवाडा-विदर्भाचा संपर्क तुटला

शुक्रवारी रात्री नांदेड शहरासह सबंध जिल्ह्य़ात सर्वदूर श्रावणधारा सुरू झाल्या. दरम्यान, मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवरून वाहणारी पनगंगा नदी वरच्या भागात झालेल्या मुसळधार पावसाने दुथडी भरून वाहत आहे. परिणामी ढाणकीमाग्रे मराठवाडा-विदर्भाचा संपर्क तुटला आहे.  भर पावसाळ्यात नांदेडकर ‘आठ दिवसाआड पाणी’ असा विदारक अनुभव कित्येक वर्षांनंतर घेत असताना, राज्याच्या इतर भागांप्रमाणे शहर व जिल्ह्य़ावर सलग तिसऱ्या दिवशी वरुणाची कृपा झाली.

मुंबईत जोरदार 

मुंबई आणि उपनगरात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळी ८.३०पर्यंत सांताक्रूझ केंद्रावर १३३.९० मि.मी., तर कुलाबा केंद्रावर ५३.६० मि.मी. पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळी ८.३० ते दुपारी २.३० या वेळेत उपनगरात अंधेरी, मालाड, पवई, मुलुंड आणि जोगेश्वरी येथे ८० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस कोसळला. तर सायंकाळी ५.३० वाजता सांताक्रूझ केंद्रावर ८१ मिमी, कुलाबा येथे ३७.६ मिमी पाऊस नोंदवण्यात आला. दिवसभरात पावसाचे प्रमाण मर्यादित असले तरी दुपारी १.४४ मिनिटांनी उधाणाची भरती आल्यामुळे शहरात अनेक सखल भागात पाणी साचले.

आणखी पाच दिवस पावसाचे..

  • चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक स्थिती आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात अतिवृष्टी ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे.
  • हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, ४ ऑगस्टला कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
  • ५ ऑगस्टला याच भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. ६ आणि ७ ऑगस्टला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल.

अतिवृष्टीचे कारण..

बंगालचा उपसागर आणि त्या पाठोपाठ मध्य प्रदेशाच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने गेल्या आठवडय़ापासून राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी आहे. सध्या अरबी समुद्र कोकण आणि गोव्याच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यातच बंगालचा उपसागर ते मराठवाडा आणि छत्तीसगड दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे.

धबधब्यात चार विद्यार्थीनी बुडाल्या

नवी मुंबईतील खारघर वसाहतीनजीक असणाऱ्या पांडवकडा धबधब्यात वर्षांसहलीसाठी आलेल्या नऊ विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थिनी बुडाल्या.

आरती नायक (नेरुळ), नेहा जैन (चेंबूर), नेहा दामा (कोपरखैरणे), श्वेता नंदी (ऐरोली) अशी वाहून गेलेल्या मुलींची नावे आहेत. यापैकी आरती, नेहा जैन आणि श्वेता नंदी यांचे मृतदेह बचाव दलाला सापडले आहेत.

पोलिसांनी पर्यटनास बंदी घातलेल्या खारघर येथील पांडवकडय़ाच्या धबधब्यात वर्षांसहलीसाठी मुंबई (चेंबूर) आणि नवी मुंबई येथील विद्यार्थ्यांचा एक गट शनिवारी सकाळी आला होता.  गोल्फकोर्सच्या वरील बाजूने ओढय़ातून विद्यार्थ्यांचा हा गट जात असताना जोराची लाट आल्याने पाय घसरून नऊजण बुडाले. ज्यांना पोहता येत होते अशा मुलामुलींनी स्वत:ला सावरले, तसेच सिडको मंडळाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बुडणाऱ्या मुलामुलींना वाचविण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान चार मुली वाहून गेल्या. सहलीसाठी आलेल्या नऊ जणांपैकी अनेक जण एसआयईएस या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.