सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस

पालघर/वसई: समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा पालघर, वसईच्या किनारपट्टीलाही मोठा फटका बसला.  सोमवारी सकाळपासूनच पालघर, वसई विरारमधील विविध ठिकाणच्या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.

पालघर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा व पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने नुकसान झाले आहे. वाऱ्याचा वेग आणि पाऊस वाढत असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.  जव्हार मोखाडा परिसरात देखील चक्रीवादळाचा थोडाफार प्रभाव जाणवला. ग्रामीण भागातही ढगाळ वातावरण व रिमझिम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले दिसून येत आहे.

भारतीय हवामान खात्याने कोकण किनारपट्टीच्या भागात येत्या दोनचार दिवसांत  चक्रीवादळ येण्याचा इशारा देण्यात आला होता. अखेर रविवारी मध्यरात्रीपासून या वादळाचे तडाखे पालघर, वसई विरारला बसण्यास सुरुवात झाली.

मध्यरात्रीपासून वादळी वारे, रिमझिम पाऊस यासह समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळण्यास सुरुवात झाली होती. सोमवारी सकाळी ११ नंतर वाऱ्याचा व पावसाचा वेग अधिक वाढला यामुळे वसईत पश्चिामेतील अर्नाळा, अर्नाळा किल्ला, यासह इतर किनारपट्टीच्या भागाचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडल्याचे दृश्य दिसून आले आहे. विरार येथील बोळींज येथे विजेच्या तारांवर ताडाचे झाड पडले तर वसईतील तर्खड वासलई रस्त्यावरील विद्युत वाहक तारेवरही झाड कोसळल्याने येथील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तर काहींच्या घरावर लावण्यात आलेले छप्परही वाऱ्याच्या वेगाने उडून गेले आहे. तसेच वसईच्या पूर्वपट्टीच्या भागातही चक्री वादळाने मोठे नुकसान केल. ऐन आंब्याच्या व जांभळाच्या हंगामात या फळझाडांचे मोठे नुकसान झाले तर काही ठिकाणी वाडीतील झाडेही आडवी झाली असल्याचे बागायतदार शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

तर दुसरीकडे मे महिन्याच्या अखेरपर्यंत ग्रामीण  भागातील विविध व्यवसाय जोर धरतात मात्र अचानक झालेल्या पावसाने त्या व्यवसायावर सुद्धा पाणी फेरले आहे. वीटभट्टीवरील सर्व तयार झालेल्या कच्च्या विटाही पावसात भिजून गेल्या आहेत. मिठागरातील तयार मिठाच्या राशीसुद्धा भिजून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.