‘सहा वर्षांच्या मुलीसाठी गरीब माता-पित्याची लढाई’ या ‘लोकसत्ता’तील वृत्तानंतर अवघ्या चार दिवसांतच राज्यभरातून, तसेच परदेशातूनही संवेदनशील वाचकांनी विवेकानंद रुग्णालयाशी संपर्क साधत तब्बल अडीच लाख रुपयांची मदत पाठविली. या मदतीमुळे मुलीच्या पालकांनी कृतज्ञता व्यक्त करून ‘लोकसत्ता’चे आभार मानले.
विवेकानंद रुग्णालयाचे डॉ. गोपीकिशन भराडिया, प्रशासकीय अधिकारी अनिल अंधोरीकर, जनसंपर्क अधिकारी विनोद खरे यांनी दिव्याचे आई-वडील पुष्पा राठोड व दत्तात्रय राठोड यांच्याकडे शुक्रवारी धनादेश सुपूर्द केला. वंशाला दिवाच हवा, या परंपरागत मानसिकतेतून मुलीचा गर्भ जन्माला येण्यापूर्वीच नष्ट करण्यात बदनाम झालेल्या बीडच्या माजलगाव तालुक्यात बंजारा समाजातील गरीब कुटुंब आर्थिक स्थिती हलाखीची असतानाही आपले सर्वस्व पणाला लावून लहान मुलीला जगविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने २३ मार्चच्या अंकात ठळकपणे प्रसिद्ध केले होते. त्याला वाचकांचा कृतिशील प्रतिसाद मिळाला.
गेल्या चार दिवसांत जवळपास सर्व जिल्हय़ांतील दानशुरांसह अमेरिका, बहारीन येथील दात्यांनीही मदतीचा हात पुढे केला.
लातूर शहरातील अकरावीत शिकणाऱ्या तीन मुलींनी प्रत्यक्ष दिव्याला भेटून आपल्या पॉकेट मनीतील पसे दिव्याच्या उपचारासाठी दिले. जळगावचे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान झारखंडात कार्यरत आहेत. त्यांनी दूरध्वनी करून मदत देऊ केली. मुंबईतील चेंबूर येथील दात्याने दरमहा २ हजार रुपये पाठविण्याचे वचन देत दोन महिन्यांचे धनादेश पाठवून दिले. मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने येथे येऊन आपल्या आईच्या नावे पसे दिले. नांदेड येथील एका हमालाने १०० रुपयांची मनिऑर्डर पाठवली, तर अहमदनगर येथील फळांचा रस विकणाऱ्या व्यावसायिकानेही मदत पाठवली. एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या नगरच्या प्रतिनिधीने खास माणूस पाठवून आपल्या कंपनीचे न्युट्रीशन फुड पाठवून दिले. मुंबईत अनिरुद्धबापूंच्या अनुयायांनी दिव्यासाठी सामूहिक प्रार्थना केल्याचे कळवले. आर्थिक मदतीबरोबरच दिव्याच्या कुटुंबीयांचे कौतुक करणारे व दिव्या लवकर बरी व्हावी, या साठी प्रार्थना करणारे ई-मेल, पत्रही अनेकांनी पाठवले.
राज्याच्या विविध भागातील डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार कोणत्या पद्धतीने सुरू ठेवावेत, या साठीच्या सूचना दिल्या. या वृत्तासंदर्भात चौकशी व मदतीसाठी आलेले सर्वाधिक दूरध्वनी आपण प्रथमच घेतल्याचे रुग्णालयाचे अधिकारी विनोद खरे यांनी या निमित्ताने आवर्जून सांगितले. रुग्णालयाचे डॉ. गोपीकिशन भराडिया यांनी दिव्याच्या आई-वडिलांनी गेल्या ५ महिन्यांपासून आपल्या मुलीवर उपचार करण्याची जिद्द दाखवली. ती कोणाकडे पाहिली नसल्याचे सांगितले. पाच महिन्यांपासून रुग्णालयाचा व्हेंटीलेटर अव्याहत सुरू आहे. डॉक्टरांचे पथक दिव्याला वाचविण्याची पराकाष्टा करीत आहेत. दिव्याच्या नाडीचे ठोके चालू आहेत, तोपर्यंत तिच्यावर उपचार केले जातील. त्यासाठी कितीही दिवस लागो, आमची तयारी असल्याचे ते म्हणाले. ‘लोकसत्ता’च्या वाचकांनी मानसिक, आर्थिक आधार दिला, त्याला तोड नाही. अशा संवेदनशील व्यक्ती, संस्थांमुळेच समाजातील चांगुलपण टिकून असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.