‘वैविध्यतेने नटलेल्या भारताला एकात्मतेच्या धाग्यात गुंफणारे हिंदुत्व हीच खरी राष्ट्राची ओळख आहे,’ असे ठणकावून सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशभर संघाच्या शाखा सुरू करण्याचे आव्हान  शुक्रवारी केले. विजयादशमीच्या मुहूर्तावर झालेले सरसंघचालकांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करत दूरदर्शनने त्यांचे विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात हातभार लावला. तर दुसरीकडे, दसऱ्याच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून देशवासियांना ‘मन की बात’ सांगितली. सरकारी प्रसारमाध्यम असलेल्या प्रसारभारतीने या निमित्ताने आपल्या पूर्वापार परंपरेचे ‘सीमोल्लंघन’ केले. मात्र, संघचालकांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण केल्याबद्दल काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह अनेक मान्यवरांनी दूरदर्शनवर हल्लाबोल केला.
संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमधील रेशीमबागेत आयोजित विजयादशमी उत्सवात दरवर्षी सरसंघचालक कार्यकर्त्यांसोबत विचारांचे सोने लुटतात. मात्र, यंदा प्रथमच दूरदर्शनने त्यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करत हे विचार देशभर थेट पोहोचवले. ‘वैविध्यतेने नटलेल्या भारताला एकात्मतेच्या धाग्यात गुंफणारे हिंदुत्व हीच खरी राष्ट्राची ओळख आहे. सर्वसमावेशकता आणि सर्वव्यापी सत्य हीच हिंदुत्वाची व्याख्या आहे. तीच खरी भारताची ओळख आहे. त्यामुळेच देशाच्या प्रत्येक गावात व समाजात संघाच्या शाखा पोहोचल्या पाहिजेत व समाजात ही शिकवण रुजवली गेली पाहिजे’, असे भागवत या वेळी म्हणाले. सरसंघचालकांनी देशापुढील समस्या, संघाची वाटचाल, मोदी सरकारची आतापर्यंतची वाटचाल यावर उपस्थितांचे बौद्धिक घेतले. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे सरसंघचालकांनी यावेळी कौतुक केले. अमेरिकेत भारतीय नेत्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे देशात एक नवउत्साहाची लहर निर्माण झाली. या भेटीतून एक सकारात्मक संदेश देशवासीयांमध्ये गेला. ते म्हणाले, ‘देशापुढे अनेक समस्या आहेत. त्यांची योग्य क्रमवारी करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी धोरणांची आखणी करून त्यांची योग्य अंमलबजावणी करता यावी यासाठी केंद्र सरकारला अधिकाधिक वेळ देण्याची गरज आहे.’ पश्चिम बंगाल, आसाम व बिहारमधील घूसखोरीचे प्रकार सुरू असून त्याचा त्रास मूळ हिंदुंना होत आहे. मात्र, तेथील सरकारे निष्क्रिय आहेत, असेही भागवत यांनी सांगितले. एकांतिक सामूहिक स्वार्थातून शोषण, दमन, हिंसा व कट्टरतेचा जन्म होतो, त्यातूनच ‘आयएसआयएस’सारख्या दहशतवादी संघटनांचा उदय होतो, असे मतही त्यांनी मांडले.
भागवत वाणी
*हिंदूंची धर्मस्थाने, स्मशान व जलभरणाचे स्रोत सर्वासाठी खुले व्हावेत
*महापुरुषांच्या नावे होणारे कार्यक्रम, उत्सवात सर्व हिंदूंचा सहभाग असावा
*मुलांवर चांगले संस्कार घडवण्यासाठी त्यांच्याशी रोज संवाद साधावा
*राजकारण, मनोरंजन व क्रिकेट या तीन बाबी सोडून मुलांशी बोलावे
*संस्कार बिघडवणारे कार्यक्रम प्रसारमाध्यमांनी दाखवू अथवा छापू नयेत
मोदींच्या ‘मन की बात’
मरगळ, नैराश्य झटका आणि देशाला संपन्नतेकडे, वैभव मिळवून देण्यासाठी आपले कौशल्य विकसित करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आकाशवाणीवरून प्रथमच देशवासीयांशी सुसंवाद साधताना केले. लोकांनी आपल्यातील क्षमता ओळखून त्यांचा योग्यपणे वापर करावा, असेही मोदी म्हणाले. दसऱ्यानिमित्त पंतप्रधानांना देशभरातील लाखो लोकांसमवेत एकाच वेळी सुमारे १५ मिनिटे संवाद साधला. यापुढेही आपण नियमितपणे देशवासीयांशी संवाद साधू, असेही आश्वासन मोदी यांनी दिले.