हिंगोली येथील लिंबाळा येथील विलगीकरण कक्षामध्ये दाखल केलेल्या आझम कॉलनीतील एका महिलेचा मृत्यू झाला. रात्री या सेंटरवर कुणीच नसल्याचा नातेवाईकांचा आरोप असल्याचे निवेदन राष्ट्रीय विराट लोकमंचच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केले आहे. जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली आहे.

विराट लोकमंचने दिलेल्या निवेदनात म्हटले, २४ जुलै रोजी मध्यरात्री २ ते २.३0 च्या दरम्यान या वृद्ध महिलेचा लिंबाळा क्वारंटाईन सेंटरमध्ये मृत्यू झाला आहे. ही महिला करोनाच्या मयत रुग्णाची आजी आहे.या महिलेचे नातेवाईक सेंटरच्या मुख्य प्रवेशद्वारावर येऊन रात्रीपासून याबाबत सूचना देण्यासाठी आवाज देत होते.परंतू त्या ठिकाणी वॉचमन किंवा डॉक्टरची उपस्थिती नाही, असे त्यांच्यासोबत असलेले त्यांच्या मुलांचे व नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सेंटरमध्ये असलेले इतर लोक अत्यंत घाबरले आहेत. येथे अत्यावश्यक सेवासुद्धा उपलब्ध नसल्याचा आरोप केला असून २८ जुलै रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

चौकशीअंती कारवाई – जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी याप्रकरणी संपर्क साधला असता प्राप्त तक्रारीवरून चौकशी समिती नेमली आहे. त्या ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जाईल, प्राप्त तक्रारीची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली आहे. ही महिला झोपेतच दगावली आहे. या सेंटरवर २४ तासांसाठी स्टाफ नियुक्त केलेला आहे. चौकशीत नातेवाई कांच्या म्हणण्यात तथ्य आढळल्यास संबंधितांवर निश्चितच कारवाई करू, अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली. उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनीही या प्रकाराची तक्रार आल्याने चौकशी करीत असल्याचे सांगत सीसीटीव्ही फुटेज तपासू व नातेवाईकांचे म्हणने ऐकून घेतले जाईल, अशी ग्वाही दिली.