सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांद्वारे जाहिरात, तसेच जाहिरातपुरस्कृत मजकूर प्रसिद्ध करून मतदारांचे ‘मत’ ठरविले जात आहे. यावर नजर ठेवण्यासाठी माध्यम संनियंत्रण समिती कार्यरत झाली आहे. आता वृत्तवाहिन्यांवरील राजकीय पक्ष व उमेदवारांच्या जाहिरातींचे प्रमाणीकरण तपासण्यासाठी माध्यम कक्षात १६ महसूल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून २४ तास वेगवेगळ्या मराठी वाहिन्या ‘पाहण्या’चे काम या कर्मचाऱ्यांना आहे.
स्मार्टफोनच्या जमान्यात तरुण मतदारांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवार एकमेकांवर टीकास्त्र व परिणामकारक मजकूर, जाहिराती पोस्ट करीत आहेत. त्यावरही जिल्हा निवडणूक विभागाचे लक्ष राहणार आहे. अशा जाहिराती व मजकुराचेही प्रमाणीकरण होणार आहे. जिल्ह्यातील ४ मतदारसंघांत ५६ उमेदवार िरगणात आहेत. यातील बहुतांश उमेदवारांचे व्हॉट्सअॅप, हाइक, ट्वीटर, फेसबुक अशा साइट्सवर खाते आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना बोटावर मोजण्याइतक्याच उमेदवारांनी आपल्या फेसबुक पेज, खाते, व्हॉट्सअॅप, हाइकवरील ग्रुपची माहिती दिली. त्यानुसार त्यांच्या पेज व अकाउंटची तपासणी संनियंत्रण समितीकडून केली जात आहे.
भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या पक्षांच्या जाहिराती वाहिन्यांवर झळकत आहेत. मात्र, या जाहिराती सतत दाखवून मतदारांचे ‘मत’ परिवर्तन केले जात आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक मिश्रा व सिंग यांनी जिल्हा निवडणूक विभागाच्या वेगवेगळ्या यंत्रणांना यावर नियंत्रण ठेवण्याची सक्त ताकीद दिली आहे. मिश्रा यांनी माध्यम कक्षास नुकतीच भेट दिली. माध्यम कक्षात टीव्हीची सोय नसल्याने जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना सूचना देऊन या कक्षात सात टीव्हींची सोय करून दिली. तसेच या वाहिन्यांवरील प्रक्षेपण पाहण्यासाठी १६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी २४ तास पाळीने वाहिन्यांवरील जाहिरातींचे प्रमाणीकरण करीत आहेत. सोशल मीडियावरील उमेदवारांच्या पेज व खात्यावरील जाहिरातपुरस्कृत मजकुराचे प्रमाणीकरण समितीकडून करण्यात येत आहे.