राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी मंत्री व ज्येष्ठ नेते गोविंदराव वामनराव आदिक यांच्यावर रविवारी सायंकाळी अशोकनगर येथील पब्लिक स्कूलच्या प्रांगणात सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी तसेच जिल्हय़ातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. या वेळी लोकांना भावना अनावर झाल्या. अंत्यविधीस विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आदिक यांचे मुंबई येथे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी ९.३० वाजता हरेगाव येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. तेथे नातेवाईक, मित्रपरिवार व आप्तेष्टांनी अंत्यदर्शन घेतले. दुपारी २ वाजता आझाद मैदानावर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. तेथे शहरवासीयांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार विजय औटी, माजी खासदार प्रसाद तनपुरे, आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष राजश्री ससाणे, माजी आमदार जयंत ससाणे यांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर दुपारी ४ वाजता अशोकनगर येथे अशोक पब्लिक स्कूलच्या प्रांगणात त्यांच्यावर सरकारी इतमामात हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी बंदुकीतून तीन फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागाचे उपाध्यक्ष असलेले त्यांचे चिरंजीव अविनाश यांनी त्यांच्यावर अग्निसंस्कार केले. या वेळी आदिक यांच्या पत्नी पुष्पलता तसेच सुजाता, अनुराधा आणि अंजली या मुली, बंधू केशवराव यांच्यासह कुटुंबीयांना शोक अनावर झाला.               
अंत्यविधीस पालकमंत्री राम िशदे, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे, माजी मंत्री मधुकर पिचड, बाळासाहेब थोरात, बबनराव पाचपुते, आमदार स्नेहलता कोल्हे, सुधीर तांबे, भाऊसाहेब चिकटगावकर, भाऊसाहेब कांबळे, शिवाजी कर्डिले, चंद्रकांत छाजेड, माजी आमदार पांडुरंग अभंग, जयंत ससाणे, भानुदास मुरकुटे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सुजय विखे, आशुतोष काळे, हेमंत ओगले, प्रेमानंद रूपवते, साहित्यिक रंगनाथ पठारे, लहू कानडे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
आदिकांना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते आले होते. शहरातील तसेच तालुक्यातील व्यापाऱ्यांनी आज दुकाने बंद ठेवली.