महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १२ वीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी पेपरफुटीच्या चर्चेने विद्यार्थ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. बुलढाण्यातील खामगावमध्ये ११ वाजता पेपरला सुरुवात झाल्याच्या काही मिनिटांनंतर पेपर व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाला. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

यंदा राज्यातून १५ लाख ५ हजार ३६५ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. राज्यभरात २ हजार ७१० केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. मंगळवारी पहिला पेपर इंग्रजीचा होता. सकाळी ११ वाजता पेपरला सुरुवात झाल्यावर ११ वाजून ०४ मिनिटांनी इंग्रजीचा पेपर व्हॉट्स अॅपवर व्हायरलदेखील झाला. पेपर सुरु होण्याच्या काही मिनिट अगोदरच प्रश्नपत्रिका परीक्षार्थींना देण्याचा नियम आहे. पण विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात मोबाईल नेण्यास सक्त मनाई आहे. मात्र, सर्व उपाययोजना करूनही पेपर कसा व्हायरल झाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आता होत आहे. खामगावमध्ये पेपर व्हायरल होताच पेपर फुटल्याची चर्चाही रंगू लागली आहे. मात्र यावर बोर्डाकडून दुजोरा मिळालेला नाही.

बुलढाण्यातील शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. इंग्रजीचा पेपर व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी यांना माहिती घ्यायला सांगितले आहे. इंग्रजीची प्रश्नपत्रिका ए ते डी अशी असते. त्यामुळे नेमकी कोणती प्रश्नपत्रिका व्हायरल झाली याची माहिती नाही, अशी माहिती सोनवणे यांनी दिली.