तालुक्यातील मुळा नदीपात्राच्या पट्टय़ात मंगळवारी सायंकाळी झालेल्या गारपिटीने कोटय़वधी रुपयांची पिके तसेच फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. गारपिटीच्या तडाख्यामुळे शेकडो शेतकरी जखमी झाले असून, या अस्मानी संकटामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. बुधवारी सकाळी आमदार विजय औटी यांनी नुकसानीची पाहणी केली व तहसीलदार तसेच कृषी खात्याच्या कर्मचा-यांना नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
खडकवाडी, वासुंदे, देसवडे, पळशी, मांडवेखुर्द, वारणवाडी येथे मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास गारपिटीस प्रारंभ झाला. तब्बल अर्धा तास झालेल्या या गारपिटीमुळे कांदा, टोमॅटो, कोबी, गहू, ऊस, हरभरा, मका, घास या पिकांसह कलिंगड, डाळिंबाच्या बागा जमीनदोस्त झाल्या. अर्धा तास जोरदार गारपिटीनंतर सुमारे पंधरा मिनिटे पाऊस सुरू होता. सुमारे पाऊण तासाच्या या प्रकोपात या सर्व गावांमधील शेतीतील पिकांचे होत्याचे नव्हते झाले असून शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. गारांचा आकार इतका मोठा होता की शेतात काम करीत असलेले शेकडो पुरुष तसेच महिला गारांच्या तडाख्याने जखमी झाले. त्यापैकी काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पळशी येथे संकरित गायीचा या तडाख्यात मृत्यू झाला तर तेथील काही घरांचे पत्रेही उडून गेले.
शेतात काम करणा-या शेतक-यांना गारपिटीचा चांगलाच मार सहन करावा लागला. त्याने सर्व जण भयभीत झाले होते. या मारापासून वाचवण्यासाठी घमेले, पायातील चपलांचा आधार घेत गारपिटीचा शेतक-यांनी अर्धा तास जीव मुठीत धरून सामना केला. गारपीट थांबल्यानंतर भयभीत झालेले शेतकरी एकमेकांना मिठी मारून अक्षरश: ढसढसा रडले.