मानसिक धक्क्याने आजारी रजेवर असलेल्या पतीला चक्क मृत घोषित करून त्याचे सर्व शासकीय लाभ पदरात पाडून घेण्याचा ‘प्रताप’ पत्नीने केला. आजारी रजेवरून कामावर रुजू झालेल्या या पतीला आपल्या पत्नीच्या ‘प्रतापा’ची माहिती समजल्यानंतर पुन्हा मानसिक धक्का बसला!
उदगीर तालुक्यातील बोरगाव येथील रहिवासी पांडुरंग बिराजदार यांना हा अनुभव आला. बिराजदार यांनी डी. एड. उत्तीर्ण केल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न केले. जालना जिल्हा नियोजन समितीतर्फे १९९२ मध्ये झालेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश आले. १९९२ मध्ये जालना येथे रुजू झाल्यानंतर १९९३ मध्ये त्यांचा विवाह झाला. १ एप्रिल १९९७ रोजी बिराजदार यांची नांदेड जिल्ह्यात बदली झाली. १९९७ पासून नांदेड जिल्हा परिषदेत ते कार्यरत होते. कालांतराने त्यांची बदली मुदखेड तालुक्यात मुक्तापूरवाडी येथे झाली. येथे नोकरी सुरू असताना २००४ मध्ये कौटुंबिक अडचणीमुळे त्यांनी दीर्घ रजा घेतली. तेव्हापासून ते रजेवर होते.
२००७ मध्ये त्यांच्या पत्नीने काही नातेवाईकांच्या मदतीने उदगीर नगर परिषदेतून पतीचे मृत्यू प्रमाणपत्र मिळविले. २९ जुल २००७ रोजी पतीचा मृत्यू झाल्याचे मृत्युपत्रात म्हटले आहे. उदगीर पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी ९ जून २०१४ रोजी हे प्रमाणपत्र दिले. नांदेड जिल्हा परिषदेत हे प्रमाणपत्र सादर करण्यात आले. या प्रकरणाची बिराजदार यांना कोणतीही कल्पना नव्हती. मानसिक धक्क्यातून सावरल्यानंतर दोन दिवसांपूर्वी ते मुक्तापूरवाडी येथे रुजू होण्यासाठी गेले. पण त्यांना ‘मृत’ घोषित केल्याचे समजल्यानंतर मोठा धक्का बसला. आपल्याच पत्नीने आपले मृत्युपत्र सादर केल्याचे समजल्यानंतर ते अवाक झाले.
मुदखेड येथे रिक्त पद नसल्याने तेथील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना जिल्हा परिषदेला पाठवले. बुधवारी नांदेड जिल्हा परिषदेत त्यांनी हे प्रमाणपत्र खोटे असल्याचे सांगून रुजू करून घेण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना साकडे घातले. बिराजदार यांच्या पत्नीने बनावट मृत्यू प्रमाणपत्र सादर करून काही रक्कम उचलली का, हे मात्र समजू शकले नाही. बिराजदार यांनीही एलआयसी कार्यालयात माहिती अधिकाराखाली अर्ज दिला व मृत्यू प्रमाणपत्र सादर करून माझ्या मासिक वेतनातून जमा झालेली रक्कम कोणी उचलली का, याची माहिती मागवली आहे.
जिल्हा परिषदेतील अधिकारीही या प्रकाराने चक्रावून गेले. बिराजदार बुधवारी जि. प. त येताच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचीही धांदल उडाली. त्यांनी या संबंधी सर्व कागदपत्रे जमा करण्याचे काम सुरू केले. मुक्तापूरवाडीची जागा भरल्याने बिराजदार यांना नेमणूक देण्यासंदर्भात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिक्षण विभागातील अधिकारी यावर कोणता तोडगा काढतात, हे एक-दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. बिराजदार यांनीच काही नातेवाइकांसमवेत प्रस्तुत प्रतिनिधीसमोर आपली कैफियत मांडली. आधीच आजाराने त्रस्त, त्यात हा दुसरा त्रास अशा कात्रीत आपण आहोत, असे सांगून शिक्षण विभागातील अधिकारी आपल्याला न्याय देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.