लॉकडाउनच्या कालावधीमध्ये पहिल्या दीड महिन्यात मी घराच्या चौकटीच्या बाहेरही गेलो नाही, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये तुम्ही वेळ कसा घालवला या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी आपल्या वयाच्या संदर्भ देत घरच्यांनी काळीज घेण्यासंदर्भात केलेला आग्रह आणि मनावरील दडपणामुळे आपण पहिला दीड महिना घराबाहेरच न पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, या मुलाखतीत शरद पवार यांनी लॉकडाउनच्या काळात काय केलं यासंदर्भात बोलताना ही माहिती दिली.

नक्की वाचा >> Coronavirus : शरद पवार म्हणतात, “ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत परिस्थिती सर्वसामान्य होईल मात्र…”

तुमच्या सारख्या मोठ्या नेत्यांना सतत लोकांमध्ये राहण्याची सवय असते. मात्र लॉकडाउनमुळे सर्वच गोष्टींवर बंदी आली. या कालावधीमध्ये तुम्ही तुमचा वेळ नक्की कसा घालवला, असा प्रश्न राऊत यांनी मुलाखतीच्या सुरुवातीलाच पवारांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी आपण केवळ घरी बसून टीव्ही पाहिला आणि वाचन केल्याचं सांगितलं. “पहिला एक दीड महिना मी माझ्या घराच्या चौकटीच्या बाहेरसुद्धा गेलो नाही. साधा अंगणातही गेलो नाही. त्याला अनेक कारणं आहेत. एकतर घरातून प्रेशर होतं. त्यानंतर तज्ज्ञांनी सांगितलेलं त्याप्रमाणे ७० ते ८० हा जो काही वयोगट आहे त्या गटाला अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. मी त्याच वयोगटात येतो. त्यामुळे घरच्यांचा आग्रह, नाही म्हटलं तरी मनावरील दडपण यामुळे मी त्या चौकटीच्या बाहेर काही गेलो नाही. बराचसा वेळ टीव्ही आणि वाचन या व्यतिरिक्त दुसरं काही फारसं केलं नाही,” असं पवार म्हणाले.

नक्की वाचा >> ‘या’ कारणासाठी लॉकडाउनमध्ये बाळासाहेबांची आठवण अधिक आली : शरद पवार

लॉकडाउनच्या कालावधी आपण संगीताचा आस्वाद घेतल्याचेही पवारांनी सांगितलं.  “या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये मी भिमसेन जोशींची अभंगासहीत सर्व गीतमाला किमान दोनदा ते तीन वेळा तरी ऐकली आहेत. संपूर्ण गीत रामायण पुन्हा ऐकण्याची संधी लॉकडाउनमुळे मिळाली. त्यामाध्यमातून ग. दि. माडगूळकरांनी काय जबरदस्त कलाकृती या देशाच्या खास करुन महाराष्ट्राच्या लोकांसाठी उभी केली हे पुन्हा एकदा लक्षात आलं,” अशा शब्दांमध्ये पवारांनी आपल्या गाणी ऐकण्याच्या सवयीसंदर्भात माहिती दिली.