नरेंद्र मोदी यांचे गुजरात मॉडेल फसवे ठरले असून, समस्त शेतकऱ्यांनाही फसवणाऱ्या भाजपचा तसेच पंतप्रधान मोदींचा गुजरातमध्ये पराभव झाल्यास आनंद होईल, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी फलटण येथे पत्रकार परिषदेत केली. सध्या गुजरातचे मतदार परिवर्तनाच्या मानसिकतेत असून, त्यांना बदल हवा असल्याचा दावा त्यांनी केला.
फलटण येथे एसटी प्रशासनाविरोधात पत्रकारांनी केलेल्या आंदोलनाला शेट्टी यांनी पाठिंबा दिला. देशातील १८४ शेतकरी संघटना एकत्र येऊन केंद्र सरकारला धडा शिकवणार असल्याचा इशारा देताना शेट्टी म्हणाले की, आम्ही लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकात भाजपासोबत होतो. परंतु, भाजप सरकार शेतकरीविरोधी ठरल्याने स्वाभिमानीने त्यांच्याशी काडीमोड घेतला. भाजपाने आपल्या तीन वर्षांच्या सत्तेच्या कालावधीत शेतकऱ्यांचा म्हणजेच आमचा विश्वासघात केला. ग्रामीण जनतेला देशोधडीला लावले. त्यामुळे त्यांना यापुढे आमचा कदापि पाठिंबा राहणार नाही. शेतकरी कर्जमाफीचा ऑनलाईन सव्र्हे करणारी कंपनी मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाशी संबंधित होती. या कंपनीने अन्य कंपन्या नेमून काम पाहिले. शेतकऱ्यांची गोपनीय माहिती घेतली गेली. संबंधितांना कर्ज कोणत्या प्रकारचे असते याचेही ज्ञान नव्हते. परिणामी त्यांनी केलेल्या सव्रेक्षणामुळे संबंधित बँका चांगल्याच वैतागल्या आहेत असेही ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 18, 2017 1:07 am