गावी जाऊ देण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेले परप्रांतीय कामगार आता मुद्द्यावरून गुद्द्यावर येऊ लागले आहेत. इचलकरंजी जवळील खोतवाडी या गावांमध्ये परप्रांतीयांना गावी पाठवण्याची तयारी सुरू असतानाच या परप्रांतीयांनी सोमवारी ग्रामपंचायत, सरपंच यांच्यावर हल्ला केला. जमावाच्या दगडफेकीत एक महिला पोलीस जखमी झाली आहे.

तारदाळ खोतवाडी या गावातील या गावात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. ते इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योग तसेच लगतच्या पार्वती व लक्ष्मी सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये काम करीत असतात. काम आणि पगार नसल्याने त्यांनी गावी जाण्याची तयारी केली आहे.

परप्रांतीयांना त्यांच्या गावी सोडण्याची तयारी सुरू असून दररोज काही रेल्वेतून कामगार त्यांच्या गावी रवाना होत आहेत. मात्र ज्यांना जाण्याची संधी मिळत नाही ते कामगार अस्वस्थ झाले आहेत. त्यातून आजचा हा प्रकार घडला. सोमवारी खोतवाडी येथे परप्रांतीय कामगार एकत्र आले त्यांनी गावी जाऊ देण्याची सोय करावी या मागणीसाठी ग्रामपंचायतीवर हल्ला केला. सरपंच संजय चोपडे यांना धक्काबुक्की केली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतल्यावर त्यांच्यावरही दगडफेक केली. त्यात एक महिला पोलीस जखमी झाली आहे. पोलिसांनी काही परप्रांतीयांना ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसात १५०० कामगारांना गावी जाण्यासाठी मदत केली. तरीही बिहार भागातील कामगारांनी केलेला हल्ला दुर्दैवी असल्याचे सरपंच संजय चोपडे यांनी सांगितले.

गुन्हे दाखल करणार –

कोल्हापूर जिल्ह्यातून राजस्थान, बिहार ,उत्तर प्रदेश या विविध राज्यांमध्ये 14 रेल्वे  गेल्या आहेत. तथापि, बिहार राज्याकडून 19 व 24 मे रोजी परवानगी मिळालेली असल्याने बिहार येथे जाणाऱ्या नागरिकांनी विनाकारण रोज रस्त्यावर उतरू नये. तसे झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना मिळालेला परवाना पास रद्द करावा, अशी प्रशासनाला विनंती करण्यात येईल. तसेच त्या कामगारांचे मुकादम व मास्टर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आज चिथावणी देणाऱ्या सात लोकांवर गुन्हे दाखल करत असून त्यांना मिळालेला परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येत आहे, असा इशारा पोलीस उप अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिला आहे.

जिल्हा प्रशासन ,रेल्वे प्रशासना बरोबर सतत संपर्कात आह. रेल्वे उपलब्ध होताच सर्व मजुरांना पाठवण्याची व्यवस्था करीत आहोत. विनाकारण रस्त्यावर येऊन कायदा-सुव्यवस्था बिघडवल्यास कायदेशीर कारवाई करावी लागेल. चुकीच्या पद्धतीने आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असे इचलकरंजीचे उप विभागीय अधिकारी डॉ विकास खरात यांनी सांगितले.