आदर्श शिक्षक निवडप्रक्रियेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना सचित्र माहितीचे प्रस्ताव सादर करावे लागतात. त्यानंतर त्यांची पुरस्कारासाठी निवड होते. या प्रक्रियेत बदल करून निवड करताना शिक्षण विभागालाच हे सर्व अधिकार द्यावेत, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे यांनी केले.
जिल्ह्यातील ७ आदर्श शिक्षकांचा सत्कार जि. प. सभागृहात शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी बनसोडे बोलत होते. शिक्षण सभापती रंगनाथ कदम, जि.प. उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, सभापती मधुकर कुरुडे, राजाभाऊ मुसळे, शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार आदींची उपस्थिती होती. पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये पाच प्राथमिकचे, तर प्रत्येकी एक माध्यमिक व विशेष शिक्षकाचा समावेश आहे. प्राथमिकमधील पुरस्कारप्राप्त शिक्षकांत माधव वायचाळ (िपपळखुटा), महानंदा दोषी (शिवणी बु.), श्रीराम संगेवाड (वसमत), रमेश काळे (सुकळी बु.) व उत्तम वानखेडे (गढाळा), माध्यमिक शिक्षक देवशिला नारायण खेबाळे (जि. प. प्रशाला, कुरुंदा), तसेच विशेष क्रीडाशिक्षक सुबोथ मुळे (जि. प. प्रशाला, जवळा बाजार) यांचा समावेश आहे. उपाध्यक्ष गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे व शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार आदींची भाषणे झाली.