माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारभार कसा करावा, याबाबत शिकवणी घेतल्यास जलसंधारण हा पहिला विषय असेल, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अजित पवार यांच्याकडे कारभार कसा करावा, यासाठी शिकवणी लावावी असे विधान केले होते. त्यावर रामदास आठवले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली.

आठवले म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांकडून जलसंधारण सोडून सर्व चांगल्या गोष्टी घ्याव्यात. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी चांगली कामेही केली आहेत, अशा शब्दांत त्यांनी पवारांना टोमणा मारताना कौतुकही केले.

गाव तिथे रिपब्लिकन शाखा : रामदास आठवले
राज्यातील विविध भागात रिपब्लिकन पक्षाचे काम चांगले असून आता गाव तिथे रिपब्लिकन शाखा या उपक्रमातून पक्ष संघटन वाढवणार भर दिला जाणार असल्याचे यावेळी आठवले यांनी सांगितले. उद्या, पुण्यात रिपब्लिकन पक्षाचे राज्याव्यापी अधिवेशन होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

आठवले म्हणाले, आमचा रिपब्लिकन पक्ष प्रत्येक गावात आहे. आज अखेर आम्ही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आता भाजपाबरोबर राहिलो आहोत. आमचा त्यांना कायम फायदा झाला मात्र त्यांचा आम्हाला काहीही फायदा झाला नसून आमचा एकही आमदार निवडून येत नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र, काही जण अपक्ष उभे राहतात आणि निवडून येतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला.