गायक-संगीतकार अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मनसे, काँग्रेस पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही याबाबत विरोध दर्शवण्यात येत आहे. सामी यांना जाहीर झालेल्या या पुरस्कारावरून राष्ट्रावादी काँग्रेसेचे प्रवक्ते व राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकावर टीका केली आहे.

“हे स्पष्टच आहे की, जर कोणी पाकिस्तानातून ‘जय मोदी’चा नारा देत असले, तर त्याला या देशाच्या नागरिकत्वाबरोबच पद्मश्री पुरस्कार मिळेल. हा देशातील जनेचा अपमान आहे. असं मलिक यांनी म्हटलं आहे.”

‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारानंतर प्रतिष्ठेचे पद्म पुरस्कार २५ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले. यात गायक-संगीतकार अदनान सामी यांच्याही नावाचा समावेश आहे.

काँग्रेसचे प्रवक्ता जयवीर शेरगील यांनी देखील या मुद्यावरूवन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. “कारगील युद्धामध्ये आपलं सर्वस्व झोकून देणारे व माजी लष्कर अधिकारी मोहम्मद सनाउल्लाह यांना विदेशी म्हणून घोषित केलं. तर दुसरीकडं भारताविरुद्ध लढणाऱ्या एका पाकिस्तानी हवाई दलातील वैमानिकाच्या मुलाला देशातील प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्कारानं गौरविण्यात येत आहे. एनआरसी आणि सरकारची चमचेगिरी केल्यामुळे हे घडलं आहे”, असं शेरगील यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंदेखील (मनसे) अदनान सामी यांना जाहीर करण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल विरोध केला आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अदनान सामी हे मूळचे पाकिस्तानी नागरिक असून त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना भारताचे नागरिकत्व प्रदान करण्यात आले. मात्र, त्यानंतर मोदींच्या दुसऱ्या सरकारच्या कार्यकाळात त्यांना लगेच पद्मश्रीने कसे काय गौरविण्यात येते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय, मोदी सरकारने अदनान सामी यांना दिलेला पुरस्कार परत घ्यावा. तसेच, आपली मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आपण याचा विरोध करीत राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.