पुणे लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याची घोषणा बुधवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. या घोषणेनंतर पुणे शहरात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, या घोषणेनंतर बारामतीतून काँग्रेसने देविदास भन्साळी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्याचे पवारांना सांगण्यात आले. त्यावर पवारांनी अतिशय गमतीदार प्रतिक्रिया दिली. अरे बापरे, भन्साळी यांना उमेदवारी म्हणजे आता आमचं डिपॉजिटही जाते की काय, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित नेत्यांना हसू आवरता आले नाही. हल्लाबोल यात्रेच्या समारोपानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुण्यात पक्षाची ताकद वाढल्याचे सांगत अजित पवारांनी पुढील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार असेल असे जाहीर केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली. या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला. पुण्यात लोकसभा निवडणुकीत उभा करण्यासाठी राष्ट्रवादीकडे ताकदीचा उमेदवार आहे. त्याशिवाय मी बोलत नसतो, असे सांगत यासाठी तयारीही सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बारामतीतून काँग्रेस देविदास भन्साळी यांना उभे करणार असल्याचे सांगताच पवारांनी अरे बापरे, भन्साळी यांना उमेदवारी जाहीर केली म्हणजे आता आमचं डिपॉजिट जाणार की काय, असे म्हटले.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलन आज अंतिम टप्प्यात आले असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. चौथ्या टप्प्याचा समारोप शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात १० जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनी होईल. आम्ही हल्लाबोल यात्रेदरम्यान महाराष्ट्राभर फिरतोय. त्यामुळे लोकांचा असंतोष जाणवत आहे. भाजपाने राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा धसका घेऊन महामेळाव्यात फक्त शरद पवारांवर टीका केली. भाजपाने राजकारणाचा गाठलेला खालचा दर्जा महाराष्ट्राने कधीच पाहिला नव्हता, असे ते म्हणाले. हल्लाबोल आंदोलनाचा पाचवा टप्पा कोकणात होणार आहे. त्यात पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोकण प्रांतातील इतर जिल्ह्यांमध्ये सभा घेतल्या जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.

भाजपच्या खासदारांचे उपोषण म्हणजे नौटंकी आहे. एका ठिकाणी उपोषणादरम्यान भाजपचे सदस्य सँडविच खाताना दिसले. युपीए सरकार असताना भाजप सभागृह चालू देत नव्हते. आता हे विरोधी पक्षावर आरोप करत आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली. सभागृह चालवण्याची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची आहे. अविश्वासाच्या ठरावाला सत्ताधाऱ्यांनी सामोरे जायला हवे, बहुमत सिद्ध करायला हवे. उपोषणाचे नाटक करून हे सरकार भावनिक वातावरण तयार करत आहे. सत्ताधारी पक्षच उपोषण करत असेल तर लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा, कोणावर असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राजकीय पक्षांमध्ये गुंडांना जागा न देण्याचा विचार करायला हवा असे मुख्यमंत्री म्हणतात. आमचेही तेच मत आहे. पण मंत्रिमंडळात अनेकांवर गुन्हे दाखल आहेत. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आधी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावे. म्हणजे इतर पक्षही त्या पद्धतीने लक्ष घालतील.