सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत असलेले प्रसाद बेंद्रे मणिपूरमध्ये तैनात होते, ड्यूटीवरुन परतल्यावर ते कुटुंबीयांना फोन करायचे, सर्वांची आपुलकीने विचारपूस करायचे, दिवाळीच्या अगोदरही त्यांनी कुटुंबीयांशी फोनवरुन संवाद साधला होता, भाऊबीजेला (९ नोव्हेंबर) घरी येतो, असे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले होते, पण नियतीने बेंद्रे कुटुंबीयांच्या आनंदावर पाणी फेरले. भाऊबीजेला घरी येतो सांगणाऱ्या प्रसाद बेंद्रे यांचे पार्थिव रविवारी घरी आले आणि कुटुंबीयांसह ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले.

पुण्यातील शिवाजीनगर गावठाण भागात राहणारे प्रसाद बेंद्रे हे बीएसएफमध्ये कार्यरत होते. ते मणिपूरमध्ये कर्तव्य बजावत होते. मलेरियाच्या विकारातून सावरत असतानाच शनिवारी प्रसाद बेंद्रे यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर रविवारी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंचमुखी मारुती मंदिर परिसरातील निवासस्थानी त्यांचे पार्थिव पोहोचताच बेंद्रे कुटुंबीयांचा बांध फुटला.

मुलाच्या आठवणीने रेखा बेंद्रे यांना रडू आवरता येत नव्हते. त्या सांगतात, प्रसाद बारावीनंतर बीएसएफमध्ये भरती झाला. चार बहिणीनंतर प्रसादचा जन्म झाला. सर्वात लहान असल्यामुळे तो घरात सर्वांचा लाडका होता. माझे पती आजारी असायचे. त्यामुळे घरातील सर्वांना सांभाळणे कठीण होते. आसपासच्या घरात धुणी भांडीची कामे करून पाच मुलांना मोठ केले. घराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने प्रसादने शिक्षण अर्ध्यावर सोडले आणि घराची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. याच दरम्यान तो सैन्य दलात भरती झाला. प्रसाद सैन्यात भरती झाल्याचा खूप आनंद झाला होता. तो कामावर असताना अनेक वेळा आमचे फोनवर बोलण व्हायचे. त्याच्या निधनापूर्वी काही दिवस अगोदर बोलण झाले होते. प्रसादला जर भाऊ असता तर त्यालाही सैन्यातच पाठविले असते, असे रेखा यांनी सांगितले.

प्रसाद यांच्या पत्नी सायली या गर्भवती असून त्या म्हणाल्या, प्रसाद हे घरातील प्रत्येकाशी नेहमी फोन वर बोलायचे. प्रत्येकाची विचारपूस करायचे. दिवाळीचा सण असल्याने केव्हा येणार असे त्यांना विचारले होते. त्यावर प्रसाद यांनी भाऊबीजेला घरी येतो असे सांगितल्याचे सायली यांनी नमूद केले. आमचं फोनवर बोलणं झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या निधनाची माहिती समजली. हे सर्व समजल्यावर काय करावे कळालेच नाही, असे सायली यांनी सांगितले.