सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर महाराष्ट्रात डान्सबार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. या निर्णयाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसंगी अध्यादेश काढू पण डान्सबार बंदी कायम ठेवू अशी प्रतिक्रिया दिली आहे.
डान्सबारच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करणार असून त्यासाठी विधी आणि न्याय विभागाची मदत घेऊ. आम्ही विधिमंडळाची मदत घेणार आहोत. आम्ही विधिमंडळात डान्सबार बंदीची सर्वपक्षीय भूमिका आधीच घेतली आहे. गरज पडल्यास अध्यादेश काढू मात्र डान्सबार बंदी कायम ठेवू असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टाने डान्सबार संदर्भातल्या अटी शिथील केल्या आहेत. मात्र आम्ही पोलिसांना सूचना देऊन स्थानिक पातळीवर कायदे कठोर आणि कडक नियम केले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विरोधक आमच्यावर खोटे आरोप करत आहेत. डान्सबारला आमचा विरोध आहे, सुप्रीम कोर्टाचा आदेश हाती आला की पुढची भूमिका ठरवू. विरोधक आमच्यावर खोटे आरोप करत आहेत असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 18, 2019 5:28 pm