खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे यांची पाठराखण केली. यावेळी त्यांनी भिडे गुरूजी आपल्यासाठी वडीलधारी व्यक्ती असून त्यांच्याबद्दल मनात खूप आदर असल्याचे सांगितले. भीमा कोरेगावच्या हिंसाचाराशी भिडे गुरूजींचे काहीही देणेघेणे नाही. त्यांच्यासारखी व्यक्ती मी उभ्या आयुष्यात पाहिलेली नाही. अनेकांना त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. त्यांनी गणितात पीएचडी केली आहे. ते जर माझे प्राध्यापक असते आणि त्यांनी मला गणिताचे प्रश्न विचारले असते तर मी नापास झालो असतो, असे उदयनराजे यांनी म्हटले. एवढ्या मोठ्या व्यक्तीवर सध्या काही लोक आरोप करत आहेत. मात्र, या लोकांची भिडे गुरूजींच्या विरोधात बोलायची लायकीही नाही, असे सांगत उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला.

… आणि मराठा रस्त्यावर उतरला तर काय होईल? उदयनराजेंनी व्यक्त केली भीती

भीमा कोरेगावच्या घटनेनंतर मी भिडे गुरूजींशी बोललो. त्यांनी या प्रकरणाशी माझा काही संबंध नसल्याचे सांगितले. आम्ही फक्त तेथील संभाजी महाराजांच्या समाधीची देखभाल करायचो. यापूर्वी त्याठिकाणी कचरा डेपो होणार होता. आम्ही तो प्रकल्प हाणून पाडला. तेव्हा इतर कोणीही पुढे आले नाही. मात्र, आता निवडणुका लागल्यानंतर या सगळ्याचं राजकारण व्हायला सुरूवात झालेय. गुरूजी याबाबत माझ्याशी बोलताना खूप भावनिक झाले होते. माझ्या आयुष्याची आता कितीशी वर्ष राहिली आहेत आणि आता माझ्यावर असे आरोप होत आहेत, हे दु:ख त्यांनी बोलून दाखवले. मी त्यांना रडू नका सांगितले. आयुष्यात मी त्यांच्यासारखा माणूस पाहिला नाही. त्यामुळे आता त्यांच्याबाबत उद्रेक होईल, असं काहीही वक्तव्य करू नका, असा इशारा उदयनराजे यांनी दिला. ज्यांनी भिडे गुरूजींवर आरोप केले आहेत त्या सर्वांना मी कुठल्याही व्यासपीठावर येऊन उत्तर द्यायला तयार आहे, असेही त्यांनी म्हटले. या सगळ्या घडामोडींमुळे शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे नुकसान झाले आहे. शहरी लोकांना त्याची जाणीव नाही. त्यामुळे भविष्यात शहरी विरुद्ध ग्रामीण असा वाद पेटू नये, अशी भीती उदयनराजे यांनी व्यक्त केली.

भिडे गुरुजींविरोधात बोलायची कोणाचीही लायकी नाही- उदयनराजे भोसले