आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा आणि शिवसेना एकत्र लढले नाहीत तर त्यांना सत्ता गमावावी लागेल आणि विरोधात बसावे लागेल असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पुणे येथील श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालापाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष शैलेश काळे,सरचिटणीस दिंगबर दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेमध्ये मागील काही महिन्यापासून शाब्दिक चकमक सुरु आहे.  बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या काळातील शिवसेना यामध्ये बराच फरक पडला आहे.  आज बाळासाहेब असते तर शिवसेनेबाबत जे बोलले जाते ते बोलण्याचे धाडस कोणीही केले नसते असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर तब्बल दोन तास चर्चा झाली.त्या बैठकीमध्ये काय घडले? याची माहिती अजून पुढे आली नाही.मात्र या बैठकीवेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आदित्य ठाकरे यांना देखील बाहेर ठेवले. नेमके या बैठकीमध्ये काय घडले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की,देशातील कोणत्याही निवडणुका आल्या की,भाजपच्या नेत्यांना काही विशिष्ट व्यक्तींना भेटण्याचे सुचते. त्यातील काल अमित शहा यांनी लता मंगेशकर,माधुरी दीक्षित आणि रतन टाटा यांची भेट घेतली.या भेटीवर त्यांनी टीका केली.

अजित पवार म्हटले की,देशात भाजपा सरकार येऊन चार वर्षांचा कालावधी झाला.या चार वर्षांत एकाही आश्वसनाची पूर्तता करण्यात हे सरकार यशस्वी ठरलेले नाही. ज्या पुण्याने आठ आमदार,खासदार आणि महापालिका देऊन देखील काय अवस्था केली आहे ते पाहा असा टोलाही त्यांनी लगावला.तर या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचे लक्ष पुणे शहराकडे नसल्याचे सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.