आत्महत्येला प्रवृत्त करण्याबद्दल आणि हत्येला जबाबदार असल्याप्रकरणीच्या कलमांतर्गत अटक झालेल्या व्यक्तीच्या समर्थनार्थ भाजपाला निषेध आंदोलन करायचं आहे. मात्र, यामुळे कोणावरही अन्याय होऊ नये, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अर्णब गोस्वामी प्रकरणावर भाष्य केलं.

राऊत म्हणाले, “आत्महत्येला प्रवृत्त करण्याबद्दल कलम ३०६ आणि हत्येला जबाबदार असल्याप्रकरणीच्या कलम ३०७ अंतर्गत एखाद्या व्यक्तीला अटक झाली आहे आणि भाजपाला या अटकेविरोधात निषेध आंदोलन करायचं आहे तर त्यांना लोकशाहीतील अधिकारानुसार आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यामुळे कोणावरही अन्याय होता कामा नये.”

“अर्णब गोस्वामी त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ते पक्षाची बाजू मांडत असतात. सामना हे जसं शिवसेनेचं मुखपत्र आहे तसं ते त्यांचं चॅनेल आहे. तो कदाचित भाजपाचा लाऊडस्पीकर असेल. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी ते उतरले असतील. पण त्याने कोणत्या प्रकारचा गुन्हा केलेला आहे आणि पोलीस कारवाई का करत आहे समजून घेणं गरजेचं होतं”, अस राऊत यावेळी म्हणाले.

“पत्रकार म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांनी कोणाला तरी हक्काचे पैसे दिले नाहीत. त्यांच्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि त्यातून आत्महत्या केली. आत्महत्या कोणामुळे केली हे लिहून ठेवलं आहे, जे सुशांत सिंह प्रकऱणात नव्हतं. पण त्या प्रकरणात वेगळी भूमिका घेण्यात आली. या प्रकरणी राज्य आणि केंद्रातील भाजपाची वेगळी भूमिका आहे हे सर्वांसमोर आणू इच्छितो,” असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.