राज्य जैवविविधता मंडळाच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदावर डॉ. विलास बर्डेकर यांच्या नियुक्तीचे आदेश गुरुवारी वनखात्याने काढले. भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांच्या लॉबीने या मंडळावर आपले वर्चस्व कायम केल्याची प्रतिक्रिया मात्र या निर्णयामुळे स्वयंसेवींच्या वर्तुळात उमटली आहे.
स्थापनेपासूनच जैवविविधता मंडळ वादग्रस्तच होते. डॉ. इरिक भरुचा यांच्या हातात मंडळाच्या अध्यक्षपदाची सुत्रे सोपवली तेव्हा कार्यालय नागपुरात आणि अध्यक्ष मात्र पुण्यात, अशी स्थिती होती. तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांच्याशी असलेल्या जवळीकीच्या संबंधांचा परिणाम म्हणून अध्यक्षपद त्यांच्या पदरात पडल्याची चर्चा त्यावेळी रंगली आणि निर्णयसुद्धा या चर्चेला साजेसेच घेतले गेल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले. डिसेंबर २०१४ मध्ये डॉ.भरुचा यांचा कार्यकाळ संपला आणि अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू झाली. दरम्यान, पाचपुते यांच्या कार्यकाळातच जैवविविधता मंडळाच्या नियमावलीत फेरफार करण्यात आले. मंडळाच्या अध्यक्षपदाच्या पात्रतेचे निकषच बदलवण्यात आले आणि विज्ञान स्नातकपदाची अट त्यात घालण्यात आली. सेवानिवृत्त झालेल्या वनाधिकाऱ्यांना सोयीस्कररित्या या पदावर बसविण्यासाठीच फेरबदल करण्यात आल्याचे आरोप त्यावेळी स्वयंसेवींनी केले आणि मंडळाच्या अध्यक्षपदावर भारतीय वनसेवेतील सेवानिवृत्त वनाधिकाऱ्याच्या नियुक्तीने हे सिद्धही झाले.
डॉ. इरिक भरुचा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सहा महिन्यांपासून हे पद रिक्तच होते. बदलण्यात आलेल्या नियमावलीनुसार या पदासाठी अर्ज मागविण्यात आले तेव्हा केवळ दोन अर्ज स्वयंसेवींचे आणि इतर सर्व अर्ज सेवानिवृत्त भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांचे होते. स्वयंसेवींपैकी राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे, अन्य एका संस्थेचे दिलीप गोडे, तर भारतीय वनसेवेतून निवृत्त झालेले डॉ. विलास बर्डेकर, डॉ.जी एन. वानखेडे, माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.डब्ल्यू.एच.नकवी आदींचा समावेश होता. सुरुवातीपासूनच या पदासाठी भारतीय वनसेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची लॉबी प्रयत्नात होती. जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिवांनी ही सर्व नावे तीन सदस्यीय समितीकडे पाठवली. तीन सदस्यीय समितीत वनखात्याचे सचिव विकास खारगे, कृषी खात्याचे सचिव, तसेच स्वाधीन क्षत्रीय यांचा समावेश होता. नियमावलीनुसार या पदासाठी किशोर रिठे, व्ही.के. मोहन आणि डॉ. विलास बर्डेकर यांची नावे पात्र ठरली. यात एक स्वयंसेवी, तर उर्वरित दोन हे भारतीय वनसेवेतील अधिकारी होते. अखेरच्या क्षणी या पदासाठी डॉ. विलास बर्डेकर यांचे नाव समोर करण्यात आले.
डॉ. बर्डेकर यांच्या नावासाठी आमदार शोभाताई फडणवीस ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशी साखळी वापरण्यात आल्याची चर्चा यावेळी होती. राज्य जैवविविधता मंडळ, हे असे एकमेव मंडळ आहे की, जेथे अध्यक्षपदासाठी स्वयंसेवींची वर्णी लागू शकते. या नियुक्तयांवर स्वयंसेवी संस्थांच्या वर्तुळात प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.